
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
राहुरी तालुक्यातील केसापूर येथे शौचालयासमोर काट्या टाकू नको, असे म्हटल्याचा राग येऊन महिलेस शिविगाळ करून कुर्हाडीने घाव घालून जखमी केले तसेच लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरी तालुक्यातील केसापूर येथे शेजारी राहणारे विकास दामोधर पुजारी, द्रौपदाबाई पुजारी, अर्चना विकास पुजारी व त्यांच्या दोन मुली हे घराच्या मागे असलेल्या शौचालयासमोर काट्या टाकत होते. त्यावेळी फिर्यादी महिला आमच्या शौचालयासमोर काट्या टाकू नका असे म्हटली असता आरोपींना त्याचा राग आल्याने या सर्वानी महिलेस शिवीगाळ केली. महिलेच्या अंगावर कुर्हाडीचे घाव घालून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करत असताना महिलेने तो वार तिच्या डाव्या हानुवटीवर बसला.
ती महिला गंभीर जखमी झाली. त्यानंतर महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी त्या महिलेचा पती आला असता त्यासही तुझाही काटा काढतो. तसेच द्रौपदाबाई पुजारी हिने दगडाने मारहाण केली. तसेच अर्चना पुजारी हिनेही मिरची त्या महिलेच्या आणि महिलेच्या पतीच्या डोळ्यात फेकली. तसेच त्यांच्या दोन्ही मुलींनी दगडफेक करून मारहाण केली. तुम्ही आता वाचला असला तरी तुमचा काटा काढणार आहे अशी धमकी दिली. यातील जखमी महिलेस कामगार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात जबाब नोंदवून तो राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.
याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा रजि.नं. 224/2023 प्रमाणे विकास दामोधर पुजारी, द्रौपदाबाई पुजारी, अर्चना विकास पुजारी व त्यांच्या दोन मुली यांच्याविरुध्द भादंवि कलम 307, 354 ए,323, 143, 147, 148,149, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.