
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
एका महिलेला लिप्ट दिल्याचा प्रकार एका शेतकर्याच्या चांगलाच अंगलट आला आहे. लिप्ट दिलेल्या महिलेने छेड काढल्याची तक्रार देण्याची धमकी देत पैशाची मागणी केली. दरम्यान, संबंधित शेतकर्याने तात्काळ नगर तालुका पोलिसांना माहिती देत फिर्याद दिली. पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. सविता बाळासाहेब मगर (रा. तपोवन रस्ता, सावेडी, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी पाथर्डी तालुक्यातील एका शेतकर्याने बुधवारी (दि. 13) दुपारी फिर्याद दिली आहे. तो शेतकरी बुधवारी सकाळी त्याच्या चारचाकी वाहनातून नगर- पाथर्डी रस्त्याने जात असताना साडे दहाच्या सुमारास कौडगाव (ता. नगर) शिवारात त्यांना सविता मगर हिने लिप्ट मागितली. आपण जांब कौडगाव येथे प्राथमिक शाळेवर शिक्षिका आहे, असे सांगितले. फिर्यादीने त्याच्या चारचाकी वाहनातून सविता मगर हिला पावणे अकराच्या सुमारास जांब फाटा येथे सोडले.
दरम्यान, तिने फिर्यादीकडे शाळेतील स्वयंपाक करणार्या महिलेला पैशाची गरज असल्याने दोन हजार रुपयांची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे दिले. सविता मगर हिने दिलेले पैसे परत न करता तू माझी छेड काढली, असे म्हणून आरडाओरडा करून दमदाटी केली. तुझ्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देणार असून तक्रार द्यायची नसल्यास तु मला आणखी दोन हजार रुपये दे, असे म्हणून फिर्यादीकडे खंडणीची मागणी केली.
दरम्यान, फिर्यादी यांनी तात्काळ नगर तालुका पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी सविता मगर विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार खरात करीत आहेत.