महिलांच्या गळ्यातील दागिनेही सुरक्षित नाही

नगर शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न || चोरट्यांचा पोलिसांना चकवा
महिलांच्या गळ्यातील दागिनेही सुरक्षित नाही

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगरच्या रस्त्यावर सोनसाखळी चोरटे सक्रिय झाले आहेत. खरेदीसाठी, कामानिमित्त घराबाहेर पडणार्‍या महिलेच्या गळ्यातील दागिने ते सहज ओरबडत आहे. हे चोरटे जिल्ह्यातील असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्ती केली आहे. परंतू त्यांचा शोध घेण्यात स्थानिक गुन्हे शाखा, नगर शहर पोलिसांना अपयश आले आहे. ते पोलिसांना चकवा देवून सर्रास चोरी करत आहे. सोनसाखळी चोरटे पकडले जात नसल्याने चोरीच्या घटनाही थांबायला तयार नाही.

यामुळे नगर शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मागील रविवारी नगर शहरातून चार महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबडले होते. या चारही ठिकाणी चोरट्यांनी बळजबरीने महिलांशी झटापड करून गळ्यातील गंठण, मंगळसूत्र तोडून धूम ठोकली. या घटनांमुळे महिलांमध्ये घबराट पसरली. दरम्यान गेल्या आठ दिवसांपासून तोफखाना, कोतवाली पोलिसांना या चोरट्यांचा शोध लागला नाही. त्यांचे गुन्हे शोध पथक यासाठी प्रयत्न करत आहे, असे सांगितले जात असले तरी त्यांच्या हाती अद्याप आरोपी लागले नाही.

सोनसाखळी चोरटे पायी किंवा दुचाकीवर जाणारी एकटी महिला पाहून तिचा पाठलाग करतात. संधी मिळताच त्या महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबडून धूम ठोकतात. सावेडी उपनगरात सोनसाखळी चोरीच्या घटना जास्त प्रमाणात घडत आहे. यामुळे रस्त्याने जाणार्‍या महिला सुरक्षित नसल्याचे दिसून येते. असे असतानाही नगर शहर पोलीस, एलसीबी पथकांना या चोरट्यांचा शोध लावण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे.

‘त्या’ पथकाचे ‘नाव मोठं’...

अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक सोनसाखळी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांचे फक्त प्रयत्न दिसतात काम मात्र काहीच दिसत नाही. यामुळे ते पथक सोनसाखळी चोरटे शोधण्याचे काम करतात का नाही, याचीच शंका आहे. त्या पथकाची सध्याची गत ‘नाव मोठं, लक्षण खोट’ अशी झाली आहे.तसेच इतर तीन पथकांनाही सोनसाखळी चोरटे शोधण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनाही चोरटे सापडत नसल्याने आचार्य व्यक्त होत आहे.

वाहतुक कोंडीत अडकलेल्या महिलेचे दागिने चोरले

वाहतुक कोंडीत अडकलेल्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मिनी गंठण चोरट्यांनी लांबविले. शुक्रवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास नगर-कल्याण रोडवरील दिनेश हॉटेलसमोर ही घटना घडली. या प्रकरणी शनिवारी तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनाली बाळासाहेब औटी (वय 27 रा. स्टेट बँकेजवळ, पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. सोनाली औटी या त्यांचा भाऊ किरण भास्कर कदम यांच्यासोबत दुचाकीवरून शुक्रवारी नेप्तीनाका येथे त्यांच्या मावशीला भेटण्यासाठी आले होते. ते पुन्हा पारनेर येथे घरी जात असताना रात्री नगर-कल्याण रोडवर वाहतुक कोंडी झाली होती. किरण त्याची दुचाकी कमी वेगात चालवित होता. तेवढ्यात पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्याने सोनालीच्या गळ्यातील दीड तोळ्याचे गंठण ओरबडले. सोनाली व किरण यांनी आरडाओरडा करून त्या चोरट्याचा पाठलाग केला असता तो वेगात पसार झाला. सोनाली यांनी शनिवारी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com