महिला डॉक्टरला एक लाखाला ऑनलाईन गंडा

मोबाईलवर आलेल्या लिंकव्दारे फसवणूक
महिला डॉक्टरला एक लाखाला ऑनलाईन गंडा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील एका खासगी रुग्णालयात मानसोपचार तज्ञ म्हणून नोकरी करणार्‍या महिला डॉक्टरच्या बँक खात्यातून 99 हजार 500 रुपये काढून घेत त्यांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. त्यांच्या मोबाईलवर आलेल्या लिंकवर त्यांनी माहिती भरल्यानंतर बँक खात्यातून पैसे काढून घेण्यात आले आहेत. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात 16 एप्रिल रोजी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी वेगवेगळ्या पाच मोबाईल नंबरधारक अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि 419, 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. 9 एप्रिल 2023 ते 13 एप्रिल 2023 दरम्यान ही घटना घडली आहे. फिर्यादी यांनी अंगठीमध्ये घालण्यासाठी पुष्कराज खडा ऑनलाईन ऑर्डर केला होता. सदर ऑर्डर घेण्यासाठी त्यांनी नोकरीला असलेल्या खासगी रुग्णालयाचा पत्ता दिला होता.

त्यानंतर एका व्यक्तीने फिर्यादी यांच्या मोबाईलवर फोन करून ऑर्डर केलेल्या पार्सलचा पत्ता बदलायचा आहे का? अशी विचारणा केली. फिर्यादी यांनी प्रतिसाद दिल्यानंतर त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅपवर एक लिंक पाठवली. फिर्यादी यांनी सदर लिंक ओपन करून समोरच्या व्यक्तीला ओटीपी दिला. त्यानंतर फिर्यादीच्या बँक खात्यातून 99 हजार 500 रूपये काढून घेण्यात आले.

आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी सुरूवातीला पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्ज दाखल केला. या अर्जाची चौकशी होऊन नंतर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे तपास करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com