कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला

गायकेमळा परिसरातील घटना; अकस्मात मृत्यूची नोंद
कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अंदाजे 55 वर्षे वय असलेल्या महिलेचा मृतदेह अहमदनगर शहरातील गायके मळा परिसरात आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटलेली नाही. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गायके मळा परिसरातील एका शेतामध्ये महिलेचा मृतदेह असल्याची माहिती गुरूवारी दुपारी एक वाजता कोतवाली पोलिसांना स्थानिक नागरिकांनी दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. सुमारे 10 ते 12 दिवसांपासून हा मृतदेह तेथे पडून असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेह आढळून आलेल्या महिलेचे वय अंदाजे 55 वर्षे आहे.

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटलेली नाही. ओळख पटविण्याचे काम कोतवाली पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने शवविच्छेदन करण्यास अडचणी निर्माण झाली आहे. जागेवरच शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया कोतवाली पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली नाही

25 फेब्रुवारी 2022 रोजी नालेगाव परिसरातील सीना नदीच्या नाल्यामध्ये एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसतानाच आता पुन्हा गायके मळा परिसरात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या दोन्ही मृतदेहांची ओळख पटविण्याचे आव्हान कोतवाली पोलिसांसमोर आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com