महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले

File Photo
File Photo

उंबरे |वार्ताहर| Umbare

पत्नी पतीच्या दुचाकीवर बसत असताना एका अज्ञात भामट्याने त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे मनी मंगळसूत्र ओरबाडून धूम ठोकली. ही घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे भर दिवसा व वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोविंद दगडू दळवी (वय 45) हे राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे कुंभार गल्लीत राहत आहेत. 12 मे रोजी गोविंद दळवी व त्यांची पत्नी दोघेजण वांबोरी येथील एका लग्न कार्यक्रमास गेले होते.

दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास लग्न लागल्यानंतर दोघे पती-पत्नी घरी येण्यासाठी दुचाकी जवळ आले. तेव्हा गोविंद दळवी यांची पत्नी शोभा दळवी या वांबोरी फाटा ते पांढरी पूल जाणार्‍या डांबरी रोडवर उभ्या होत्या. त्यावेळी त्या दुचाकीवर बसत असताना अचानक एक अज्ञात इसम पाठीमागून आला आणि शोभा दळवी यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे मनी मंगळसूत्र ओरबाडून घेतले. त्यावेळी शोभा दळवी यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो हाताला झटका देऊन पळाला आणि पुढे चालू असलेल्या एका दुचाकीवर जाऊन बसला. त्या दुचाकी स्वाराने त्याची दुचाकी भरधाव वेगात चालवून वांबोरी फाटा ते पांढरी पुलाकडे जाऊ लागले. तेव्हा काही लोकांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र ते सुसाट वेगात निघून गेले.

घटनेनंतर गोविंद दगडू दळवी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दोन भामट्यां विरोधात गुन्हा रजि. नं. 513/2023 भादंवि कलम 392 प्रमाणे रस्तालुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com