
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
दुचाकीवरून घराकडे जाणार्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मिनीगंठण दोन अनोळखी चोरट्यांनी ओरबडून नेले. सदरची घटना शनिवारी (दि. 29) सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन भागातील छायानगरमध्ये प्रितम एजन्सीजवळ घडली.
याप्रकरणी प्रिया मुकुंद जव्हर (वय 35 रा. लक्ष्मी कृपा हौसिंग सोसायटी, रेल्वे स्टेशन) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजता प्रिया त्यांच्या मुलाला घेऊन दुचाकीवरून पुस्तक घेण्यासाठी गेल्या होत्या.
त्या पुन्हा घराकडे येत असताना त्यांच्या मोबाईलवर फोन आला. तेव्हा त्या प्रितम एजन्सीजवळ फोनवर बोलत असताना समोरून दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने प्रिया यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, परंतू त्या फोनवर बोलत असल्याने त्यांनी लक्ष दिले नाही. त्याचदरम्यान दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या इसमाने प्रिया यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मिनीगंठण ओरबडले.
गंठणचा काही भाग खाली पडला व काही भाग चोरटे घेऊन पसार झाले. दरम्यान, घडलेल्या प्रकारामुळे व जवळ कोणी नसल्याने प्रिया घाबरल्या होत्या. त्यांनी घर गाठून पतीला झालेला प्रकार सांगितला व त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.