
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुक्यातील घाटशिरस येथील शेळ्या चालणार्या महिलेला मारहाण करून गळ्यातील चार ग्रॅम सोने व 29 शेळ्या अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने लूटून नेल्याची घटना सोमवारी (दि.2) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण शेतकरी वर्गामध्ये भीतीच वातावरण पसरले आहे.
या प्रकरणी अरुणा दिलीप गर्जे (रा. घाटशिरस, ता. पाथर्डी) यांनी पाथर्डी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार गर्जे या 47 लहान मोठ्या शेळ्या घेऊन करडवाडी, घाटशिरस डोंगर रानात चारण्यासाठी घेवुन गेल्या हेत्या. दिवसभर शेळ्या चारुन सायं. 6:30 वाजण्याच्या सुमारास त्या घरी पंरत जाण्यासाठी निघाल्या होत्या.
यावेळी अचानक एक पांढ-या रंगाचे पिकअप आले व रस्त्यावर थांबले. त्यावेळी अज्ञात तीन ते चार चोरट्यांनी गर्जे यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील चार ग्रॅम सोने व 29 शेळ्या पांढ-या रंगाच्या पिकअपमध्ये भरुन त्या पळवुन नेल्या. या शेळ्यांची बाजार भावाप्रमाणे सुमारे साडे तीन लाख रुपये किंमत मानली जाते आहे. पाथर्डी पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.