
संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील चंदनापुरी येथील रहिवाशी मंदा सुभाष काळे (वय 55) या महिलेच्या घरात घुसून मारहाण करत डोक्यात कोयत्याने वार केल्याची घटना घडली असून सदर महिला गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंदा काळे ही महिला चंदनापुरी येथे राहात आहे. त्या घरासमोर असताना मच्छिंद्र सूर्यभान राहाणे हा तेथे आला आणि म्हणाला की, तुमची मुले (नात) आमच्या शेतात का खेळतात? तुमचे बापाचे शेत आहे का? त्यावेळी मंदा म्हणाल्या तुम्ही आमच्या शेतातून उपनेर का घेऊन जाता असे म्हणाल्याचा राग आल्याने मच्छिंद्र याने मंदा यांना शिवीगाळ केली तुला काय करायचे ते करून घे अशी धमकीही दिली. त्यावेळी मच्छिंद्र याने मुलगा अजय व पत्नी संगीता यांना बोलावून घेतले. त्यावेळी मंदा या घाबरून गेल्या आणि घरात पळून गेल्या.
त्यानंतरही मच्छिंद्र व त्याची पत्नी संगीता यांनी मंदा यांच्या घरात घुसून त्यांच्या सुनेस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.त्यानंतर मच्छिंद्र याने हातातील कोयता मंदा यांच्या डोक्यात मारून जखमी करत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. जखमी महिलेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी मंदा काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी वरील तिघांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 214/2023 भारतीय दंड संहिता कलम 45, 324, 323, 509, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इस्माईल शेख करत आहेत.