
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
सायकलचा धक्का लागला म्हणून समजून सांगण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळी सिध्दार्थनगरमध्ये घडली. मोनिका ज्ञानेश्वर वाघमारे (वय 27 रा. लक्ष्मीमाता मंदिराजवळ, सिध्दार्थनगर) असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीवरून सुनीता किशोर भोसले व अनिता साठे (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता मोनिका वाघमारे दुकानामध्ये जात असताना त्यांना सुनीता भोसले हिच्या मुलाकडून सायकलचा धक्का लागला. त्या मुलाला समजून सांगत असताना सुनीताला त्यांचा राग आला.
या रागातून सुनीता व तिची आई अनिता यांनी मोनिका वाघमारे यांना शिवीगाळ करत दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मोनिका यांनी रविवारी रात्रीच तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणार्या दोघींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.