महिलेसह चौघांना मारहाण करत सव्वा लाखाची लूट

संगीत पार्टीसाठी मुली देण्याच्या बहाणा
महिलेसह चौघांना मारहाण करत सव्वा लाखाची लूट

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

उस्मानाबादच्या कलाकेंद्रावर संगीत पार्टीत नृत्य करण्यासाठी मुली देण्याच्या बहाण्याने कलाकेंद्र चालक महिलेसह दोघांना राशीन येथे बोलावून त्यांना सात ते आठ जणांनी मारहाण करत सव्वा लाखाची लूट केल्याची घटना शुक्रवारी (दि.20) रात्री घडली. या प्रकरणी कर्जत पोलीसांना दोघांना अटक केली आहे.

या प्रकरणी सुरज भूषणराव आंबेकर (रा.लातूर, हल्ली आळणी ता.जि.उस्मानाबाद) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार त्यांचा कलाकेंद्रात संगीत पार्टीचा व्यवसाय असून ते आळणीफाटा येथे पिंजरा सांस्कृतिक कला केंद्र येथे पार्टी चालवतात. त्यांच्या पार्टीत एक नर्तिकेची राशीन येथील आरती भोसले या इनस्टाग्राम अकाउंटवरून तिची ओळख झाली होती. मागील दहा दिवसांपासून आरती भोसले (रा.राशीन) ही मला तुमच्या पार्टीत काम करायचे आहे असे म्हणाली. यासाठी उचल 70 हजार व इतर दोन मुलींसाठी प्रत्येकी 40 हजार अशी देऊन तिला पार्टीत घेण्याचे ठरले.

ठरल्या प्रमाणे तील पैसे देण्यासाठी आंबेकर व इतरजन राशीन येथे आले. त्यांना करमाळा रोड वर बोलवून त्यांच्याकडून 70 हजार रूपये घेतले. तसेच अन्य दोन मुली पुढे राहतात असा बहाणा करून गाडी अज्ञातस्थळी आणल्यावर दोन अनोळखी मुली व अनोळखी व्यक्ती गाडीच्या दिशेने चालत आले. मुलींना देण्यासाठी रोख रक्कम नसल्याने एटीएममधून पैसे काढतो असे फिर्यादीने सांगितले. गाडीत बसताच लपून बसलेल्या सात ते आठ जनाांनी आंबेकर यांना मारहाण करत गळ्यातील सोन्याची चैन, खिशातील पाकीट व हातातील अंगठी काढून घेतली.

त्यानंतर एकाने चाकूचा धाक दाखवून चालकाकडून मोबाईल व पाकीट बळजबरीने घेतले. गाडीत बसलेल्या फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले. फिर्यादीच्या बरोबर आलेल्या सचिन कापसे यांना मारहाण करून त्यांच्या हातातील अंगठी व खिशातील पाकीट काढून घेऊन त्यांना कॅनॉलमध्ये ढकलून दिले. सोबत असलेली नर्तिका हिला मारहाण करून मोबाईल काढून घेतला. या गुन्ह्यात एकूण 1 लाख 27 हजारांचा मुद्देमाल त्यांनी लूटमार करून नेला. या तक्रारीवूरन कर्जत पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरच्या प्रकाराचे गांभीर्य ओळखून कर्जत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली. तात्काळ शोध घेऊन दोन संशयितांना कर्जत पोलीसांनी अटक केली असून त्यांना चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित, पोलीस जवान मारुती काळे, भाऊ काळे, अर्जुन पोकळे, श्याम जाधव, संपत शिंदे, महादेव कोहक यांनी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित हे करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com