अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
कार्यक्रम एकचा, निधी दुसर्याचा आणि रुबाब मात्र तिसराच दाखवतो, असा काहीसा प्रकार जिल्हा परिषदेच्या महिला बचत गटाच्या प्रदर्शनाबाबत घडतांना दिसत आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या महिला बचत गटांच्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून जिल्हा परिषदेकडून दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेले साईज्योती स्वयंसहायता प्रदर्शन यंदा कृषी विभागाकडून हायजॅक झाले आहे.
यंदा या प्रदर्शनात कृषी महोत्सव व पशु प्रदर्शन भरवण्यात येत आहे. या तीन विभागांच्या प्रदर्शनाला एकत्र करून नगर महोत्सव असे नाव देण्यात आले आहे. मात्र या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून हे प्रदर्शन केवळ कृषी विभागाचेच असल्याचे भासते आहे. विशेष म्हणजे हा प्रकार काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषद यंत्रणेच्या लक्षात आल्यानंतर देखील कृषी विभाग झेडपीवर भारी पडल्याचे दिसत आहे.
साईज्योती स्वयंसहायता यात्रा या नावाने जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून दरवर्षी महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला राज्यस्तरीय बाजारपेठ मिळावी म्हणून दरवर्षी जानेवारीत बचतगटांचे हे प्रदर्शन भरवले जाते. 300 ते 400 स्टॉल या प्रदर्शनात बचतगटांच्या महिलांसाठी उपलब्ध करून दिले जातात. जिल्ह्यासह जिल्ह्याच्या बाहेरूनही महिलांनी उत्पादित माल घेऊन प्रदर्शनात सहभागी होत.
चार ते पाच दिवसांत चांगली विक्री होत असल्याने या महिलांच्या उत्पन्नात चांगली भर पडे. विविध वस्तूंची विक्री, तसेच खाद्यपदार्थ्यांच्या विक्रीतून बचतगटांची उन्नती साधली जायची. विशेष म्हणजे नगरच्या महिला बचत गट प्रदर्शनाची वाट राज्यातील विविध जिल्ह्यातील महिला बचत गट पाहत असतात. या ठिकाणी लाखांच्या संख्येने गर्दी होवून बचत गट प्रचंड यशस्वी झाल्याचा इतिहास आहे.
मात्र, यंदा या प्रदर्शनात पशुसंवर्धन विभाग व राज्य शासनाचा कृषी विभाग यांना सामावून घेतले केले आहे. त्यामुळे बचत गटांच्या या प्रदर्शनात कृषी महोत्सव व पशु प्रदर्शन यांनी घुसखोरी केली. त्यातही कृषी विभागाने पहिल्या दिवसापासून हे प्रदर्शन हायजॅक केल्याचे दिसते आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत केवळ कृषी विभागाची जाहिरात करण्यात आलेली आहे. त्यात या प्रदर्शनाचा आत्मा असलेल्या बचत गटांच्या महिलांना कोठेही स्थान देण्यात आलेले नाही. शिवाय कृषी विभागाने या प्रदर्शनात तब्बल 220 स्टॅाल घेतले आहेत. त्यामुळे महिला बचत गटांसाठीच्या या प्रदर्शनाचा उद्देश कितपत सफल होईल, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
झेडपीचे 40 लाख, कृषीची 20 लाख
या प्रदर्शनाच्या खर्चासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व पशुसंवर्धन या जिल्हा परिषदेच्या दोन्ही विभागांचे प्रत्येकी 20 लाख अशा एकूण 40 लाखांची तरतूद आहे. तर राज्याच्या कृषी विभागाची केवळ 20 लाखांची तरतूद आहे. असे असतानाही कृषी विभागाचे या प्रदर्शनात वर्चस्व आहे. सर्व नियोजन, तसेच स्टॉल वाटपही त्यांचेच अधिकारी करत असल्याची माहिती मिळाली. यामुळे यंदा महिला बचत गटांच्या साहित्याच्या विक्रीचे काय होणार हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.