फिर्यादी व साक्षीदार झाले आरोपी

कोतवाली पोलिसांनी चोरीचा बनाव केला उघड
फिर्यादी व साक्षीदार झाले आरोपी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दोन लाख 40 हजार रुपयाची रक्कम व दुचाकी चोरीला गेल्याची खोटी फिर्याद दिल्याने कोतवाली पोलिसांनी फिर्यादी होत दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अशोक पंढरीनाथ परभणे (वय 42 रा. बाबुर्डी घुमट ता. नगर) व त्याचाकडील कामगार जोगेंदर खदारू चव्हाण (वय 26 हल्ली रा. बाबुर्डी घुमट, मूळ रा. उत्तरप्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता परभणे व चव्हाण कोतवाली पोलीस ठाण्यात आले. परभणे पोलिसांना म्हणाला, माझा कामगार जोगेंदर चव्हाण याच्या ताब्यातून दोन लाख 40 हजार रुपयांची रक्कम व दुचाकी चोरून नेली आहे. चितळे रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेसमोर ही घटना घडली आहे. म्हणून माझी तक्रार आहे. गुन्हा दाखल करून शोध घ्यावा, असे त्याने पोलिसांना सांगितले.

दरम्यान पोलिसांनी चितळे रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेजवळ जाऊन याबाबत माहिती घेतली असता त्यांना अशी घटना घडल्याबाबत साक्षीदार मिळून आले नाही. फिर्यादी परभणे व कामगार चव्हाण यांच्या बोलण्यामध्येही विसंगती आढळून आल्याने पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज कचरे, अंमलदार गणेश धोत्रे, भिंगारदिवे, योगशे खामकर, रियाज इनामदार, अमोल गाढे, सुजय हिवाळे, संदीप थोरात, सोमनाथ राऊत, एकनाथ निपसे यांनी परभणे व चव्हाण यांच्याकडे स्वतंत्र चौकशी केली. चव्हाण याच्या अंगझडतीमध्ये एक लाख 43 हजार 500 रुपयांची रोकड मिळून आली. परभणे व चव्हाण यांनी रक्कम व दुचाकी चोरीला गेल्याचा बनाव कोतवाली पोलिसांनी उघडकीस आणला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com