विना इंटरनेट शैक्षणिक सॉफ्टवेअरची निर्मिती

विना इंटरनेट शैक्षणिक सॉफ्टवेअरची निर्मिती

राहाता |वार्ताहर| Rahata

विना इंटरनेट वापरता येईल असे शैक्षणिक सॉफ्टवेअची निर्मिती करून शाळा, विद्यार्थी, पालक यांच्यात समन्वय घडवून आणण्याचे काम राहाता येथील शिक्षक विनोद वैद्य यांनी केले आहे.

डिजिटल युगात इंटरनेट शिवाय कुठलेही काम होत नाही. सर्व क्षेत्रात इंटरनेट आवश्यक बाब झाली आहे. इंटरनेट डाटा मिळवण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात. शाळा, विद्यार्थी, पालक यांच्यात समन्वय राहावा व त्यांची शैक्षणिक कामे तात्काळ व्हावी यासाठी राहाता येथील शिक्षक विनोद वैद्य यांनी विना इंटरनेट वापरता शैक्षणिक सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे.

याविषयी माहिती देताना श्री. वैद्य म्हणाले, शाळेत विद्यार्थ्यांना बोनाफाईड, शाळा सोडल्याचा दाखला व इतर दस्तावेज मिळण्यासाठी विलंब होत असतो. बर्‍याचदा दुर्गम भागात शाळेमध्ये इंटरनेटसाठी रेंज उपलब्ध नसल्यामुळे शिक्षण विभागाला माहिती देण्यासाठी खूप वेळ लागतो. या सर्व गोष्टीचा विचार करून विना इंटरनेट वापरता येईल, असे सॉफ्टवेअर बनवण्याचे ठरवले. त्यामुळे शैक्षणिक कामे वेळेत होण्यास मदत होईल. शैक्षणिक संस्थेबरोबरच हे सॉफ्टवेअर बँक व इतर कार्यालयांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

हे सॉफ्टवेअर सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध केले जाणार असून याचा जास्तीत जास्त उपयोग संस्थेने करून घ्यावा, असे आवाहन विनोद वैद्य यांनी केले. हे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी प्राचार्य इंद्रमान डांगे, शिर्डी येथील साई निर्माण शैक्षणिक प्राचार्य अंत्रे, प्रा. मोबीन शेख यांचे मार्गदर्शन लाभले. साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजय कोते, ताराचंद कोते, पंकज लोढा यांनी विनोद वैद्य यांचे अभिनंदन केले आहे. विनोद वैद्य हे राहाता येथील नामदेव शिंपी समाजाचे नेते बापूसाहेब वैद्य यांचे चिरंजीव आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com