
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. या नुकसानीपोटी शेतकर्यांना 950 कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे. याबाबत शासन पातळीवर बैठक झालेली असून हिवाळी अधिवेशात याबाबत सादरीकरण झाल्यानंतर शेतकर्यांना मदतीचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
रविवारी पालकमंत्री विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नैसर्गिक आपत्तीपोटी देण्यात येणारी भरपाई, पीक विमा, लम्पी चर्म रोग, गौण खनिज आणि विकास कामे याबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी आ. बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासह सर्व उप विभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यात गौणखनिज अभावी महामार्ग आणि अन्य सरकारी कामे बंद राहणार नाहीत. ज्यांना खानपट्टीची गरज आहे, त्यांनी रितसर परवागनी घ्यावी. शासनाचे धोरण हे विकासाला प्राधान्य देण्याचे आहे. जिल्ह्यातील खाण पट्टयामधुन अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन होणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना अंमलात आणत विकास कामांसाठी आवश्यक असलेल्या खनिजासाठी महसूल विभागाकडून रीतसर परवानगी घेण्याची सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यात जनावरांच्या लम्पी आजाराचा प्रार्दुभाव कमी होत आहे. मात्र, तरी देखील गाफील राहून चालणार नाही. आतापर्यंत लम्पी रोगामुळे 2 हजार 800 जनावरांचा बळी घेतला असून यातील 1 हजार 200 ते 1 हजार 400 शेतकर्यांना मदत देण्यात आलेली असून उर्वरित शेतकर्यांना आठ दिवसात मदत देण्यात येणार आहे.
प्रशासकीय कामे आणि प्रशासन गतीमान करण्यासाठी पुढील आठवड्यापासून विभागनिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. एका बैठकीत विभागाचा आढावा होत नाही. यामुळे संबंधीत विभागाचे जिल्ह्याच्या विकासात योगदान वाढवण्यासाठी विकास कामातील अडथळे दूर करून लोकाभिमुख काम करण्यात येणार असल्याचे विखे पाटील म्हणाले. पिक विम्यापासून शेतकरी दूर जाणे हे चित्र चिंताजनक आहे.
प्रत्येक तालुक्यातील शेतकरी संख्या आणि पीक विमा योजनेचा लाभ घेणार्या शेतकर्यांच्या संख्येतील तफावत खूप मोठी असल्याने कृषी विभागाला विमा योजनेच्या संदर्भात प्रभावी काम करावे लागेल, असेही विखे पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी अन्नधान्य वितरण, वीज वितरणचा उपस्थित अधिकार्यांकडून सविस्तर आढावाही घेतला.