डिसेंबर अखेर शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडविणार

शिक्षणाधिकारी पाटील यांचे संघटनांना आश्वासन
डिसेंबर अखेर शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडविणार

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांमध्ये सहकार्य वृत्ती आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी जिल्ह्याचा शैक्षणिक गाडा चालवताना सर्वांना बरोबर घेऊन कार्य करणार आहे. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची मी माहिती घेतली असून २०२२ सुरू होण्यापूर्वी डिसेंबर अखेर जिल्ह्यातील शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लागलेले दिसतील, असे आश्वासन जिल्ह्याचे प्राथमिक विभागाचे नूतन शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांनी दिले.

पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा शिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्विकारला. त्यानिमित्ताने जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा गुरुमाऊली मंडळ, जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक, जिल्हा मुख्याध्यापक संघ, उच्चाधिकार समिती, नपा, मनपा शिक्षक संघ, पदवीधर शिक्षक संघ इत्यादी संघटनांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी झालेल्या चर्चेमध्ये पाटील बोलत होते.

शिक्षकांचे पगार एक तारखेला होणे, मुख्याध्यापक व पदवीधर पदोन्नती, फंडाची प्रकरणे आदी प्रश्न महत्त्वाचे आहेत. करोनाचे संकट हळूहळू कमी होत असल्यामुळे जिल्ह्यातील शाळांचे शैक्षणिक वातावरण पूर्वपदावर आणण्यासाठी सर्व शिक्षक संघटनांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हा संघाचे नेते तथा अध्यक्ष बापूसाहेब तांबे, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलीमखान पठाण, संतोष दुसुंगे, शरद सुद्रिक, मनोज सोनवणे, विठ्ठल फुंदे, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन साहेबराव अनाप, राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट, जिल्हा गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष राजकुमार साळवे, शिक्षक संघाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष गोकुळ कळमकर, निवृत्त शिक्षण विस्ताराधिकारी नवेद मिर्झा, राजू राहणे, व्हाईस चेअरमन गंगाराम गोडे, संचालक सुयोग पवार, आर. टी. साबळे, शिक्षक संघाचे राज्य प्रतिनिधी मच्छिंद्र लोखंडे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र गजभार, पारनेर तालुका अध्यक्ष सूर्यकांत काळे, नितीन पंडित, रवींद्र कडूस आदी उपस्थित होते.

पगार शिक्षक बँकेत द्या

जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार स्टेट बँक की सेंट्रल बँक या घोळात आठवडाभर उशिरा होतात. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची खाती शिक्षक बँकेत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने शिक्षकांचे पगार शिक्षक बँकेत द्यावेत. ज्या दिवशी चेक मिळेल त्याच दिवशी पगार शिक्षकांच्या खात्यावर जमा करू याबाबत विचार व्हावा, अशी मागणी माजी चेअरमन सलीमखान पठाण यांनी केली. यासंदर्भातही माहिती घेऊ आणि शक्य असल्यास कार्यवाही करू असेही शिक्षणाधिकारी पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com