जाब विचारल्याचा राग आल्याने पतीची पत्नीला मारहाण

राहुरी तालुक्यातील धानोरे येथील घटना
जाब विचारल्याचा राग आल्याने पतीची पत्नीला मारहाण
Crime

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

सोन्याची पोत बँकेत ठेवून आणलेले पैसे कोठे ठेवले? असे विचारल्याचा राग आल्याने पतीने पत्नीला मारहाण करून तिचे दात पाडले. तर भाया व पुतण्याने कुर्‍हाडीने मारहाण करून जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील धानोरे येथे दि. 9 मे रोजी घडली.

सौ. उषा गोरक्ष शिंदे, वय 47 वर्षे, रा. धानोरे, ता. राहुरी या महिलेने दि. 9 मे रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान दारू पिऊन आलेल्या पतीला विचारले, मी सोन्याची पोत बँकेत ठेवून आणलेले पैसे कोठे ठेवले? असे विचारल्याचा राग आल्याने तिच्या पतीने तिला शिवीगाळ करुन तुला काय करायचे आहे. माझा भाऊ व मी बघून घेऊ. असे म्हणून त्याने पत्नी उषा शिंदे यांना मारहाण करून त्यांचे दोन दात पाडले. तसेच इतर आरोपींनी कुर्‍हाडीच्या दांडा, लोखंडी पाईप व गजाने मारहाण करून जखमी केले. तू आम्हाला हिशोब विचारते का? तुला घरात रहायचे असेल तर नीट रहायचे. नाहीतर तुला जिवे मारुन टाकू. अशी धमकी दिली.

घटनेनंतर सौ. उषा गोरक्ष शिंदे यांनी राहुरी पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी पती गोरक्ष भाऊसाहेब शिंदे, भाया बाप्पू भाऊसाहेब शिंदे व पुतण्या राहुल बाप्पू शिंदे सर्व रा. धानोरे, ता. राहुरी या तिघांवर मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हवालदार साईनाथ टेमकर हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.