
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
बाभूळगाव येथील प्रकल्प पूर्ण होऊन सौर उर्जा निर्मिती तीन महिन्यांपासून सुरू असताना हा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यास शिंदे-फडणवीस सरकार परवानगी देत नसल्याने या विरोधात येत्या विधानसभा अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
आमदार तनपुरे म्हणाले, सन 2019 पूर्वीच युती सरकारने सौरऊर्जा प्रकल्प राज्यात आणला होता. हा प्रकल्प शेतकर्यांच्या हिताचा असल्याचे पाहून त्यास महाविकास आघाडी शासनाच्या काळात आम्ही प्राधान्य दिले. ऊर्जा राज्यमंत्री असल्याने मी राहुरी मतदार संघातही बाभूळगाव, आरडगाव, वांबोरी व शिरापूर येथे सौर उर्जा प्रकल्पाला मंजुरी आणली.
महाविकास आघाडी शासनाने शेतकर्यांना दिवसा वीज मिळावी, या हेतूने हा प्रकल्प आणला होता. परंतु प्रकल्प कार्यान्वित होऊनही शेतकर्यांना वीजपुरवठा केला जात नाही. त्यापैकी बाभूळगाव येथील प्रकल्प पूर्ण होऊन सौर उर्जा निर्मिती तीन महिन्यांपासून सुरू असताना हा प्रकल्प सुरू करण्यास शिंदे फडणवीस सरकार परवानगी देत नसल्याने या विरोधात विधानसभा अधिवेशनात आवाज उठविणार आहे.
आ. तनपुरे म्हणाले.महाविकास आघाडी शासन काळामध्ये उर्जा राज्यमंत्री म्हणून शेतकर्यांच्या हितासाठीच निर्णय घेतले. वीजेची समस्या सोडविताना वीज बिल माफीच्या योजना आणल्या. अडचणीत सापडलेल्या महावितरण कंपनीची भरभराट होऊन महावितरण कंपनीला उर्जीत अवस्थेत आणले. शेतकर्यांना दिवसा वीज देण्याच्या सौर उर्जा प्रकल्प उद्देशाने पायाभरणी केली होती. बाभूळगाव येथील सौर उर्जा प्रकल्प सुरू होऊन तेथील प्रतिदिन निर्मित होणारी 25 हजार युनिट वीज शेतकर्यांना न देता ती स्वस्त असणारी वीज महावितरणला विक्री केली जात असल्याचे आ. प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले.
नगर जिल्ह्यात आम्ही महावितरण मार्फत किती विकास कामे केली हे जनतेला व लोकप्रतिनिधींना ठाऊक आहे. परंतु विरोधक हे नेहमीच श्रेयवादासाठी झटताना दिसत आहेत. महाविकास आघाडी व आमदार तनपुरे यांना सौर उर्जा प्रकल्पाचे श्रेय मिळू नये, म्हणून शेतकर्यांना वेठीस धरण्याचे काम होत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे आमदार तनपुरे यांनी सांगितले.अनेक ठिकाणी विरोधकांनी तर काही स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या अडचणी मांडल्या. त्यावर मात करून सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू आहे.
ऊर्जा राज्यमंत्री असताना वांबोरी 8 कोटी, गणेगाव 8 कोटी, बाभूळगाव 18.70 कोटी, आरडगाव 24 कोटी रुपयांचा निधी या सौर उर्जा प्रकल्पांसाठी मंजूर करून आणला आहे. दरम्यान बाभुळगाव वीज प्रकल्पामध्ये सौर ऊर्जेने मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होत असताना त्याचा लाभ शेतकर्यांना मिळत नसल्याने राज्य शासनाला वठणीवर आणण्यासाठी विधानभवनात हल्लाबोल करू व कोणत्याही परिस्थितीत शेतकर्यांना दिवसा वीज मिळवून देऊ, अशी माहिती आमदार तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.