तोफखान्याच्या डिबीत कोणाची वर्णी?

तोफखान्याच्या डिबीत कोणाची वर्णी?

शहर उपअधीक्षक करणार निवडी

अहमदनगर|Ahmedagar

तोफखान्याचे गुन्हे शोध पथक (डीबी) दोन वेळेस बरखास्त झाल्यानंतर आता तिसर्‍यांदा निवड केली जाणार आहे. डिबीमध्ये कोणते अधिकारी, कर्मचारी घ्यायचे याचा निर्णय शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे घेणार आहे. गुन्ह्याचा तपास करण्यात ज्या अधिकारी, कर्मचार्‍यांचा हातखंडा आहे. अशांची कामगिरी पाहून त्यांचा डिबीमध्ये समावेश केला जाणार असल्याचे उपअधीक्षक ढुमे यांनी सांगितले. यामुळे नवीन डिबीत कोणाची वर्णी लागते याची चर्चा पोलीस ठाण्यात रंगली आहे.

सावेडी उपनगराची जबाबदारी असलेल्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्ह्याचे प्रमाण अधिक आहे. चोर्‍या, घरफोड्या, सोनसाखळी चोरी, दरोड्याबरोबरच खून, खूनाचा प्रयत्न, मारहाण आदी गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. प्रलंबित गुन्ह्यांची संख्या अधिक असताना रोज नवीन गुन्ह्याची त्यात भर पडत आहे. हे गुन्हे निकाली काढून आरोपींच्या मुसक्या आवळण्याठी डिबी काम करत असते. गेल्या दोन महिन्यात तोफखान्याची डिबी चांगलीच चर्चेत राहिली. गुन्ह्याचा तपास लागत नसल्याने यापूर्वी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी डिबी बरखास्त करण्याचे आदेश दिले होते. डिबी बरखास्त झाल्यानंतर पुन्हा नव्याने डिबीची नियुक्ती करण्यात आली. नवीन डिबी स्थापन होताच त्यातील पोलीस हवालदार बार्शिकर काळे याने लाच घेतल्याने पुन्हा त्याचे खापर डिबीवर फुटले. शहर उपअधीक्षक ढुमे यांनी डिबी बरखास्त करत आता नवीन डिबी मी स्थापन करणार असल्याचे पत्रच त्यांनी पोलीस ठाण्याला पाठविले आहे.

आता तिसर्‍यांदा डिबीची स्थापना केली जाणार असल्याने त्यात कोणाची वर्णी लागते, याची चर्चा पोलीस ठाण्यात रंगली आहे. कर्मचार्‍यांची कामगिरी पाहता डिबीमध्ये कोणाचा समावेश करायचा यांची चाचपणी वरिष्ठांना करावी लागणार आहे. डिबी प्रमुख पदासाठी पोलीस ठाण्यात सध्यातरी कोणी उत्सुक असल्याचे दिसत नाही. गुन्ह्याचे वाढते प्रमाण, तपास करताना होणारी कसरत यामुळे ते पद नकोच अशी भूमिका अधिकार्‍यांची आहे. यामुळे चांगल्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची नियुक्त करण्याचे आवाहन उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्यावर आहे.

...........

तोफखाना पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांची नियुक्ती झाल्यापासून दोन वेळेस डिबी बरखास्त करण्याची वेळ आली आहे. यामुळे आता तिसर्‍यांदा डिबीमध्ये कोणाची नियुक्ती करायची याचा निर्णय वरिष्ठ घेणार असल्याने पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी संयमी भूमिका घेतली आहे. वरिष्ठांच्या पद्धतीने डिबी स्थापन होणार असल्याने निरीक्षक गायकवाड यांनी सध्यातरी शांत राहणे पसंत केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com