चंद्रकांत पाटील आज नगरमध्ये ; महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी?

चंद्रकांत पाटील आज नगरमध्ये ; महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी?

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी आज (शुक्रवारी) नगर दौर्‍यावर येत आहेत. यावेळी मनपातील विरोधी पक्ष नेतेपदाचा विषयावर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पक्षात मनपा विरोधीपक्ष नेते पदावरून मतभेद निर्माण झाल्याने प्रदेश नेत्यांना यात लक्ष घालण्याची वेळ आली आहे. यामुळे आजच्या दौर्‍यात पाटील कोणता तोडगाकडून विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लावणार याकडे नगरचे लक्ष लागले आहे.

महापालिकेत सत्ताबदल झाल्यानंतर विरोधात व 15 नगरसेवक असलेल्या भाजपकडे विरोधी पक्षनेतेपद येणार हे निश्‍चित आहे. या पदासाठी महापौरपदावरून पायउतार झालेले बाबासाहेब वाकळे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. वाकळे यांच्या प्रयत्नानंतर स्थायी समितीचे सभापतीपदासाठी भाजपला रामराम करून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले व आता मी भाजपचाच असल्याचे भासवणारे मनोज कोतकर यांनीही जोरदार हालचाली सुरू केल्या. विरोधी पक्षनेतेपदासाठी पक्षातर्फे किंवा पक्षाच्या गटनेत्यातर्फे महापौरांना शिफारस करावी लागते. गटनेत्या मालन ढोणे आहेत.

त्यांच्या पत्रालाही महत्त्व आहे. वाकळे आणि कोतकर यांनी आपल्याला पद मिळावे, यासाठी पक्षातील जास्तीत जास्त नगरसेवकांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. या दोघांनीही यासाठी एकमेकांच्या भागातील नगरसेवकांना आपल्यासाठी सह्या मिळविल्या आहेत. वास्तविक नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे हे पद मिळत नसते, याची महापौर असलेल्या वाकळे यांनाही कल्पना आहे आणि कोतकर यांनाही याची माहिती आहे. मात्र आपली शक्ती दाखविण्याचा दोघांकडून प्रयत्न होत आहे.

विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र तथा भैय्या गंधे प्रयत्नशील आहेत. मात्र, त्यांचे प्रयत्न नगरसेवकांच्या सह्या मिळवून नव्हे तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसी चर्चा करून सुरू आहेत. गंधे यांच्या नावाला सत्ताधार्‍यांचाही विरोध नसल्याचे समोर आले आहे. उलट वाकळे आणि कोतकर यांच्या सह्यांच्या मोहिमेमुळे पक्षात नाराजी निर्माण झाली आहे. अशी पद्धत पक्षात नसल्याचे सांगण्यात येते.

उलट यामुळे नगरसेवकांची विभागणी होऊन नाराजीचे प्रकार घडू शकतात. या प्रकारामुळे पक्षश्रेष्ठीही नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच गटनेत्या ढोणे यांनी महापौरांना पत्र देऊन विरोधी पक्षनेतेपदावर परस्पर कोणाचीही नियुक्ती करण्यात येऊ नये, असे म्हटले आहे. यामुळे प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या दौर्‍याला महत्व आले असून विरोधपक्ष नेत्यांच्या निवडीवर प्रदेशाध्यक्ष पाटील काय तोडगा काढणार याकडे भाजपसह नगर शहराचे लक्ष लागून आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com