काम करताना अधिकार्‍यांनी तक्रार करण्यापेक्षा मार्ग शोधावा - आ. विखे

श्रीरामपूर पंचायत समितीत तालुका टंचाई आढावा बैठक
काम करताना अधिकार्‍यांनी तक्रार करण्यापेक्षा मार्ग शोधावा - आ. विखे

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

तालुक्यात प्रत्येक गावात काहीना काही प्रश्‍न असतात, अडचणी असतात. त्यामुळे विकास कामे होत नाही. त्यासाठी निधी मिळत नाही. अधिकारी

वर्गाने मात्र त्या सोडविण्यासाठी तक्रार करणे उचित नाही. त्यासाठी मार्ग शोधला पाहिजे किंवा त्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे प्रतिपादन आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

काल श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभागृहात काल तालुका आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आ. राधाकृष्ण विखे पा. होते. यावेळी सभापती सौ. संगिता शिंदे, माजी सभापती दिपक पटारे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, जि. प. सदस्य शरद नवले, माजी सभापती नानासाहेब पवार, नानासाहेब शिंदे, गिरीधर आसने, गणेश मुदगुले, कल्याणी कानडे, वैशाली मोरे, गटविकास अधिकारी श्री. आभाळे आदी उपस्थित होते.

यावेळी अधिकार्‍यांना आ. विखे प्रश्‍न विचारत असताना त्या प्रश्‍नाचे उत्तर न देता आपला विषयच पुन्हा पुन्हा वाचून दाखवत होते. त्यामुळे अधिकार्‍यांच्या अज्ञानपणा पाहून आ. विखे यांनी नाराजी व्यक्त केली.

यावेळी आ. विखे म्हणाले, जनतेची विकास कामे करताना बहुतांश वेळी निधीचा प्रश्‍न येत असतो. मात्र त्यासाठी पाठपुरावाही महत्वाचा असतो. त्यामुळे अधिकार्‍यांनी त्यासाठी न थांबता त्यातून मार्ग काढावा.

यावेळी ग्रामीण भागासह तालुक्यात आतापर्यंत 950 जणांना करोना लसीकरण करण्यात आले आहे, अशी मागणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली. तालुक्यात आणखी काही ग्रामीण रुग्णालये झाली पाहिजे असे आ. विखे यांनी सांगितले. गोदावरी पट्ट्यात किमान एक ग्रामीण रुग्णालयत असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले

कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती अधिकार्‍यांनी दिली. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना, कृषी क्रांती योजना याच्या लाभार्थ्यांची निवड कशाप्रकारे केली जाते असे आ. विखे यांनी विचारले असता. याप्रश्‍नाची उत्तर देण्याऐवजी पुढील विषय वाचन करुन दाखवल्याने आ. विखे यांनी नाराजी व्यत केली.

बालविकास प्रकल्प योजनेअंतर्गत तालुक्यातील काही शाळांच्या भिंती पडलेल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी पदे रिक्त आहेत. मात्र काही ठिकाणी जागेच्या अभावी शाळा खोल्यांचे काम करता येत नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

शिक्षण विभागात याअगोदर नाऊर शाळाच्या खोल्या पडल्या होत्या. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. काही खोल्याची कामे पूर्ण झाली आहे. यावेळी मात्र तालुक्यातील 8 शाळा खोल्यांच्या बांधकामाचे प्रस्ताव पाठविले होते ते सर्व मंजूर झाले आहेत. यात कान्हेगाव-2, सतिगिरणी-2, हनुमानवाडी-1, लक्ष्मीवाडी-1, खोकर-1, गोवर्धनपूर-1 या गावातील शाळा खोल्यांचे काम लवकरच सुरु करणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे यांनी सागितले. यावेळी समाजकल्याण शिष्यवृत्तीसाठी शासनाकडे 1 कोटी 17 लाख रुपयांची गरज असल्याचेही श्री. दिवे यांनी सांगितले. शेवटी सभापती सौ. संगिता शिंदे यांनी आभार मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com