
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
म्हसोबा देवाची यात्रा असल्याने मंडळाची बॉडी बदला, असा व्हॉट्सअॅप ग्रुप वर मेसेज टाकल्याने एका जणाला बेदम मारहाण झाल्याची घटना शहरातील इंदिरानगर परिसरात शनिवारी घडली. या मारहाण प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील इंदिरानगर गल्ली नं. 10 मध्ये म्हसोबा मंदिर असून दि.22 रोजी म्हसोबाची यात्रा आहे. या परिसरात राहणार्या निलेश गाडेकर याने काही दिवसांपुर्वी व्हॉट्सअॅप ग्रुपवर मंडळाची बॉडी बदला असा मेसेज टाकला होता. यामुळे संतापलेल्या चार जणांनी शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास गाडेकर याला घराबाहेर बोलावून घेतले, संदीप डोंगरे याने तोडात चापट मारून म्हसोबा मंदिराजवळ घेऊन गेले. तेथे संजय उर्फ पिंटू गाडे व बाळासाहेब शिंदे होते. त्यावेळी चौघांनी हाताने व पायाने मारहाण केली.
भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या गाडेकर यांच्या आईलाही धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्याचा भाऊ मंगेश हा सकाळची भांडणे मिटवण्यासाठी गेला असता म्हसोबा मंदिराजवळ हरिश थोरात, संदीप डोंगरे, संजय उर्फ पिंटु गाडे, बाळासाहेब शिंदे थांबलेले होते. यावेळी निलेश गाडेकर व त्याचा भाऊ त्यांना सामजावून सांगत असताना त्याचा त्यांना राग आला. हरिश थोरात याने लाकडी दांडक्याने संदीप डोंगरे याने गजाने संजय उर्फ पिंटू गाडे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीत निलेश जखमी झाला. चौघांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत निलेश बाळू गाडेकर (वय 30, रा. इंदिरानगर गल्ली नं 10) याने पोलिसांकडे जबाब नोंदवला. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हरिश थोरात, संदीप डोंगरे, संजय उर्फ पिंटू गाडे, बाळासाहेब शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल धनवट हे करत आहे.