अहमदनगर (प्रतिनिधी) -

नगर शहराचे नाव बदलण्याची भाषा करणारे खा. सदाशिव लोखंडे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काय योगदान दिले? ते बोलावे. एका लोकप्रतिनिधीने

बेरोजगारी, करोनाचे संकट, शेतकरी प्रश्न आदी ज्वलंत प्रश्न सोडून अशा पध्दतीने चुकीचे विधान करणे हे हास्यास्पद असल्याचे राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष साहेबान जहागीरदार यांनी खा. लोखंडे यांना टोला लगावला आहे.

नगर शहराचे नाव बदलण्याची मागणी करुन खा. लोखंडे यांनी नवीन वादाला तोंड फोडले आहे. तर शहराच्या नामांतरावरुन सुरु करण्यात आलेले जातीयवादी राजकारण खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करोनाच्या संकट काळात कणखर भूमिका घेऊन राज्याला योग्य दिश दिली. त्यांचा चेहरा व पक्ष पाहून नागरिकांनी लोकसभेच्या निवडणुकीत लोखंडे यांना दुसर्यांदा खासदार होण्याची संधी दिली.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी शहराचे नाव बदलण्यावरुन कोणी राजकारण करु नये, असे बजावले असताना शिवसेनेचे खासदार यांनी हा चुकीचा मुद्दा उपस्थित करुन दोन समाजात दुही निर्माण करण्याचे काम केले आहे. आपल्या मतदार संघात किती वेळ थांबून जनतेचे प्रश्न सोडविता? याचे उत्तर देखील त्यांनी द्यावे. नागरिकांची जिल्हा नामांतरची नव्हे तर विकासाची भावना असून खासदारांना ही भावना कशी कळली नाही? केंद्रात जाऊन खासदार लोखंडे भाजपची भाषा बोलू लागले असल्याचा आरोप जहागीरदार यांनी केला आहे. अहमद निझामशाहने नगर शहराची स्थापना केली.

शहराला पाचशे वर्षापेक्षा जास्त कालावधीचा मोठा इतिहास आहे. अहमद शहाने हा शहर विकासात्मकदृष्टया इतकार सुंदर बनवला होता कैरो, बगदाद सारख्या शहराशी नगरची तुलना होत असे. मात्र, मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्याचे ढोंग करणार्या लोकप्रतिनिधीला हा इतिहास माहित नसणार. जिल्ह्यातील जनता सुज्ञ असून अशा चुकीच्या राजकारणाला बळी पडणार नसल्याचे जहागीरदार यांनी म्हटले आहे.