श्रीरामपूर, राहुरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन - कानडे

श्रीरामपूर, राहुरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन - कानडे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर व राहुरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, विमा कंपन्यांनी दिलेली तुटपुंजी नुकसान भरपाई शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळणारी असून 100 टक्के नुकसान भरपाई न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगसेवक अशोक कानडे यांनी दिला.

श्रीरामपूरसह राहुरी तालुक्यातील 32 गावांमध्ये पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळी सणात पावसाने शेतकर्‍यांच्या आनंदावर विरजन घातले आहे. या बिकट पार्श्वभुमीवर कानडे यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळासह तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन दिले. यावेळी कानडे यांनी सद्यस्थिती लक्षात आणून देत शेतकर्‍यांना तात्काळ मदत जाहीर करण्याची मागणी केली.

विमा कंपन्यांनी शेतकर्‍यांना दिलेल्या तुटपुंज्या नुकसान भरपाईने थट्टा केली असून याचाही शासनाने विचार करावा, असे ते म्हणाले. ओला दुष्काळ जाहीर न झाल्यास तसेच पीक विमा कंपनी व कृषी विभागाच्या चेष्टेखोर निर्णयाविरुध्द श्रीरामपूर कृषी कार्यालयावर गुरुवार दि. 27 रोजी स. 11 वा. शेतकर्‍यांसह घेराव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी विष्णूपंत खंडागळे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, सतीश बोर्डे, अ‍ॅड. समीन बागवान, हरिभाऊ बनसोडे, सुरेश पवार, अजिंक्य उंडे, राजेंद्र कोकणे, रमेश आव्हाड, अमोल आदिक, महेश लासुरे, दगडु उंडे, बाळासाहेब शिरोळे, दत्तात्रय जाधव, निखील बोरुडे, सचिन बडाख, विजय गायके, बाळासाहेब उंडे व शेतकरी उपस्थित होते.

पीक विमा संदर्भात लवकरच बैठक

शेतकर्‍यांना पिकविमा कंपन्यांनी दिलेली मदत तुटपुंजी आहे, हे अशोक कानडे यांनी तहसीलदार पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनीही विमा कंपन्यांच्या धोरणाविषयी नाराजी व्यक्त केली. याप्रश्नी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांबरोबर लवकरच बैठक घेऊ, असे तहसीलदार पाटील म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com