पारनेर |तालुका प्रतिनिधी|Parner

पारनेर तालुक्यातील किन्ही येथे एका शेतकर्याच्या कोरड्या विहिरीमध्ये बिबट्या पडला त्या बिबट्याला

वन अधिकारी व कर्मचार्यांनी दिवसभर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला अखेरीस संध्याकाळच्या सुमारास बिबट्या पिंजर्यात आला व त्यानंतर त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

किन्ही येथील सोन आंबी परिसरामध्ये धोंडीभाऊ खोडदे यांची विहीर असून दि. 10 रोजी सकाळी 11 च्या सुमारास त्या विहिरी जवळून जात असताना बिबट्याचा आवाज संपत खोडदे व किरण खोडदे यांना आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले तर बिबट्या विहिरीत पडल्याचे त्यांना दिसला.

त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती शेतकरी नेते अनिल देठे यांना कळवली .त्यानंतर देठे यांनी पारनेरच्या वनक्षेत्रपाल सीमा गोरे व पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना याबाबतची माहिती कळवली. त्यानंतर वन विभागाचे पथक तसेच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. विहीर सात ते आठ परस खोल असल्याने बिबट्याला वर काढण्यासाठी या पथकाला मेहनत घ्यावी लागली. विहिरीमध्ये पिंजरा सोडला असता बिबट्याविहिरीच्या कपारीमध्ये शिरला. तीन ते चार वेळा पिंजरा पुन्हा विहिरीत सोडल्यानंतर अखेर संध्याकाळी सातच्या सुमारास बिबट्या पिंजर्यामध्ये गेला.त्यानंतर त्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

मागील शुक्रवारी याच विहिरीच्या परिसरामध्ये शेतकर्यांनी बिबट्या पाहिला होता कदाचित त्या दिवशी हा बिबट्या त्या विहिरीमध्ये पडला असेल. अशी शक्यता तेथील शेतकर्यांनी वर्तवली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून किन्ही बहिरोबावाडी, करंदी या परिसरामध्ये बिबट्या सतत आढळून येत होता शेतकर्यांना यामुळे आपला जीव मुठीत धरून शेतीची कामे करावी लागत होती. तसेच शेतकर्याच्या पाळीव प्राण्यावर बिबट्याने हल्ला केला होता. गेल्या दोन महिन्यांपूर्वी बिबट्याच्या पिलाचा याच परिसरामध्ये मृत्यू झाला होता.

जिल्हा उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी जिल्हा सहाय्यक वन संरक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल संदीप भोसले भाळवणीचे वनपाल रोडे वनरक्षक निलेश बढे, अश्विनी सोळंके, निर्मला शिंदे ,गजानन वाघमारे, हरिभाऊ आठरे, वन कर्मचारी दादा राम तिकोने, जनार्दन बोरुडे तसेच हेडकॉन्स्टेबल भालचंद्र दिवटे ,सत्यम शिंदे, शेलार, यादव आदींनी बिबट्याला बाहेर काढण्यासाठी परिश्रम घेतले. अधिकार्यांची निष्काळजी बिबट्या विहिरीत पडला त्याला वर काढण्यासाठी स्थानिकांनी वन विभागाच्या पथकाला मदत केली.

मात्र पारनेरच्या वन क्षेत्रपाल अधिकारी सीमा गोरे यांनी घटनास्थळी थांबून राहणे गरजेचे होते मात्र काही वेळ थांबल्यानंतर बिबट्या बाहेर काढण्यापूर्वी त्या तिथून निघून गेल्या असल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली तसेच अनेक वेळा परिसरात बिबट्या असल्याची माहिती कळवली मात्र त्यांनी पिंजरा लावण्यास टाळाटाळ केली त्यामुळे गोरे यांच्या कार्यशैलीवर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दरम्यान, या परिसरामध्ये सतत बिबट्याचा वावर असल्याची माहिती वनविभागाला आपण कळवली होती. वारंवार वन विभागाकडे पिंजरा लावण्याबाबत मागणी केली गेली होती. अखेर बिबट्या विहिरीत पडल्यानंतर वन विभागाच्या अधिकार्यांना जाग आल्याचे शेतकरी नेते अनिल देठे म्हणाले.