नववर्षाचे स्वागत यंदाही घरीच!

‘थर्टी फस्ट’ पार्ट्यांना थोडीशी वेसण, नवी नियमावली जारी
नववर्षाचे स्वागत यंदाही घरीच!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar'

सरत्या वर्षाला निरोप देतानाच नव्या वर्षाचे स्वागत उत्साहात आणि जल्लोषात करण्याची परंपराच बनली आहे. मात्र, आधीच असलेला करोनाचा प्रादूर्भाव आणि त्यात ओमिक्रॉनचा वाढलेला धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने नागरिकांच्या उत्साहाला थोडीशी वेसण घालणारा निर्णय घेतला आहे.

करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येत्या थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागत सोहळ्यांसाठी राज्य शासनानं नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये खबरदारी म्हणून लोकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र न येता यंदा हे सोहळे अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे, असं या नियमावलीत म्हटलं आहे.

अशी आहे नवीन नियमावली..

- थर्टीफर्स्ट आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडता शक्यतो घरीच साधेपणानं सोहळा करावा.

- 25 डिसेंबर पासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशाचं काटेकोरपणे पालन व्हावं.

- थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसन क्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत तर खुल्या जागेत 25 टक्के मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी असेल.

- या ठिकाणी गर्दी न होता सोशल डिस्टंसिंगचं पालन व्हाव. मास्क, सॅनिटायझरच्या वापराकडं विशेष लक्ष दिलं जावं तसेच या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात यावं.

- 60 वर्षांवरील नागरिकांनी आणि दहा वर्षांखालील मुलांनी आरोग्याच्या सुरक्षेसाठी शक्यतो घराबाहेर जाण टाळावं.

- 31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी, बागा, रस्त्यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करु नये. सोशल डिस्टंसिंगचं पालन करावं. मास्क आणि सॅनिटायझरच्या वापराकडे विशेष लक्ष द्यावं.

- नववर्षाच्या स्वागतानिमित्त कोणत्याही प्रकारच्या धार्मिक-सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढू नयेत.

- नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अर्थात 1 जानेवारी रोजी बहुसंख्य लोक धार्मिकस्थळी जात असतात. अशा ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. या ठिकाणी आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य खबरदारी घ्यावी.

- फटाक्यांची आतषबाजी करु नये, ध्वनिप्रदुषणच्या नियमांचेही काटेकोरपणे पालन व्हावं.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com