विकेंड लॉकडाऊनमुळे नगरमध्ये शुकशुकाट

किराणा, मेडिकल सुरू : लसीकरण, जेवणाला रांगा!
विकेंड लॉकडाऊनमुळे नगरमध्ये शुकशुकाट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विकेंड लॉकडाऊनला शुक्रवारी रात्रीपासून सुरूवात झाल्यानंतर नगरमधील रस्त्यावरील गर्दी गायब झाली आहे.

किराणा, मेडिकल दुकाने सुरू असली तरी त्या खरेदीला माणसे मात्र फिरकेनाशी झाल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून आले. करोना लसीकरण केंद्रांवर मात्र गर्दी लोटली. पोटाची खळगी भरण्यासाठी शिवभोजन थाळीसाठीही रांगा लागल्या आहेत. शहर, उपनगरातील रस्त्यावर शुकशुकाट असल्याचे दिसत होते.

शुक्रवारी रात्रीपासून विकेंड लॉकडाऊन सुरू झाला. सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी असल्याने शुक्रवारी दुपारपासूनच नागरिकांनी खरेदीला गर्दी केली होती. शनिवारी सकाळी मॉर्निंग वॉकलाही नगरकर बाहेर पडले नाहीत. शहरासह उपनगरातील रस्ते निर्मनुष्य होते. चार-दोन मोटारसायकली रोडवर नजरेस पडत होत्या. चौकाचौकांत पोलीस होते. ते मोटारसायकल, कारचालकांना अडवून चौकशी करत होते.

दिल्लीगेट, माळीवाडा, सावेडी, बालिकाश्रम रोड, बोल्हेगाव, मुकुंदनगर, केडगाव, सारसनगर भागातील किराणा, मेडिकल दुकाने वगळता इतर सगळेच बंद होते. बस स्टॅन्डवर दिसणारी नेहमीची वर्दळ काल दिसली नाही. मात्र, तेथील शिवभोजन केंद्रावर भुकेसाठी रांगा लागल्या होत्या. लसीकरण केंद्रांवर गर्दी उसळली होती.

पोलिसांचा फेरफटका...

चितळे रोड, कापडबाजार, दाळमंडई, नवीपेठ या बाजारपेठेतील रस्ते ओस पडले होते. माणसं रस्त्यावरून गायब होती. खरेदीसाठी ग्राहक नसल्याने किराणा दुकानदारांनीही शटर डाऊन केले. सकाळीच पोलिसांनी शहर, उपनगरांत फेरफटका मारत लॉकडाऊनची जाणीव करून दिली. भाजीपाला विक्री करणारी गुजरी/मंडई आज भरलीच नाही. तर अनेक ठिकाणी रस्त्यावर असणार्‍यांची पोलिसांनी कसून चौकशी केली.

काल सकाळी काही वेळ दूध विक्री आणि किराणा दुकाने काही काळ उघडी होती. मात्र, अकारानंतर पोलिसांनी तिही बंद केली. रस्त्यावर तुरळकपणे एखादे दुसरे वाहन दिसत होते. तर तुरळकपणे एसटीच्या बसेस दिसत होत्या. मात्र, माळीवाडा, पुणे आणि तारकपूर एसटी स्थानकात कोणीच नव्हते. शहर लगत असणार्‍या गावांतही दिवसभर शुकशुकाट होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com