VIDEO : गरीब-श्रीमंतीच्या विषमतेमुळे महाराष्ट्राची फाळणी!

सार्वमत-देशदूत वेब व्याख्यानमाला : हेरंब कुलकर्णी यांच्या ‘दारिद्य्राची शोधयात्रे’तील निरीक्षण

अहमदनगर (प्रतिनिधी)-

आपण सामाजिक समरसतेच्या गप्पा करत असलो तरी अलिकडच्या दशकात आपण गरीब आणि श्रीमंत अशा गटात महाराष्ट्राची फाळणी करून टाकली आहे. विशेष म्हणजे गरीब या घटकाचे आपल्याला कोणतेही सोयरसूतक नाही, असे निरिक्षण विचारवंत, अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांनी नोंदविले. ‘दारिद्य्राची शोधयात्रा’ हा अभ्यास अहवाल करताना नजरेसमोर आलेला महाराष्ट्र विदारक असल्याचे ते म्हणाले.

सार्वमत-देशदूत वेब व्याख्यानमालेतील अखेरचे पुष्प कुलकर्णी यांनी गुंफले. ते म्हणाले, खुली अर्थव्यवस्था स्वीकारून 25 वर्षे झाल्यानंतर 2016 मध्ये देशाने काय कमावले आणि काय गमावले? देशातील गरीबी कमी झाली का? अशी चर्चा सुरू झाली. यावर परस्परविरोधी मतप्रवाह होते. आपण प्रत्यक्ष जावून स्थिती बघितली पाहिजे, असा विचार मनात आला. त्यामुळे महाराष्ट्रातील गरीबीचं वास्तव काय, याचा अभ्यास करण्यासाठी त्यावेळी 4 महिने राज्यात फिरलो.

1970 च्या दशकात गावातील गरिब माणूस आणि श्रीमंत माणूस याच्यात फार अंतर नव्हते. त्यामुळे सर्वांचे जगणेही सारखं असायचं. सर्व रेशनच्या दुकानात जायचे, एसटीने प्रवास करायचे, गावाच्या दवाखान्यात जायचे. जीवनमान जवळपास सारखं होतं. मात्र गेल्या 15-16 वर्षात अस जाणवलं की एकाच गावात दोन वेगवेगळी जग निर्माण झाली आहेत. गरीब आणि श्रीमंत यांच्यात प्रचंड विषमता निर्माण झाली. एकाच मुंबईत धारावी झोपडपट्टी आणि शेकडो कोटींचे अंबानींचं घर, अशी दोन टोकं आपल्याला पहायला मिळतात. हेच चित्र आपल्याला प्रत्येक तालुक्याचे गाव आणि खेड्यापर्यंत दिसायला लागलं आहे. गरीबी वास्तवात हटली की नाही, हे माहित नाही. पण ती माध्यमातून, कादंबरीतून, चित्रपटातून, गाण्यांमधून मात्र हटली.

अभिताभ बच्चन यांच्या जुन्या चित्रपटांत नायक हा झोपडपट्टीत राहाणारा असायचा. राज कपूर आपल्या चित्रपटात कायम गरीबांचा प्रतिनिधी होता. आज चित्रपटात गरीबी दिसणारच नाही. आजकाल सर्वत्र फिलगुड असल्याच चित्र रंगवलं जातं. आपल्या बोलण्यातून, चर्चेतूनही गरीबी हा विषय येत नाही. मात्र वास्तव मांडल पाहिजे यासाठी राज्यातील 24 जिल्ह्यात प्रत्यक्ष फिरलो. तेव्हा एकाच महाराष्ट्रात दोन महाराष्ट्र आहेत, अस लक्षात आलं. मुंबई-पुणे-नाशिक या त्रिकाणातील महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्र असे ते दोन भाग. एक गरिबांचा महाराष्ट्र आणि दुसरा श्रीमंतांचा महाराष्ट्र!

आजही अनेक ठिकाणी गरीब जनतेला सकस अन्न मिळू शकत नाही. शिक्षण, रोजगार, आरोग्य, शेती अशा सर्वच बाबींची ‘गरिबी’ ठळकपणे जाणवली. सरकारी यंत्रणेचा भ्रष्टाचार खोलवर रूजला आहे. त्याचा थेट परिणाम ग्रामीण महाराष्ट्रातील गरिबांवर होतो. 3 हजार लोकसंख्येच्या गावाला दारूदुकानाची परवानगी मिळते. पण त्याचवेळी आरोग्य केंद्रासाठीचे निकष मात्र 5 हजार लोकसंख्येचे आहेत. ढासळलेल्या सामाजिक, आर्थिक स्थितीचा पट उदहारणांसह मांडत कुलकर्णी यांनी महाराष्ट्र दाखवला जातो, तसा चकचकीत नाही याची जाणीव करून दिली. प्रारंभी शिक्षण अभ्यासक संदीप वाकचौरे यांनी त्यांचा परिचय करून दिला.

Related Stories

No stories found.