हवामान खात्याकडून मंगळवारपर्यंत यलो अलर्ट

दीड महिन्यांत लाखभर हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचा अंदाज
हवामान खात्याकडून मंगळवारपर्यंत यलो अलर्ट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात शुक्रवारपर्यंत मुसळधार पाऊस झाला असून या पावसामुळे खरीप हंगामातील सोंगणीसाठी तयार असणार्‍या पिकांची स्थिती गंभीर झाली आहे. जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या 15 दिवसात म्हणजेच दीड महिन्यांत एक लाख हेक्टरच्या जवळपास खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने मंगळवारपर्यंत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात जूनपासून आतापर्यंत 547.3 मिली मीटर पावसाची नोंद झाली असून त्याची सरासरी 121.6 टक्के झाली आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत पडणार्‍या पावसामुळे खरीप हंगामातील काढणीला आलेल्या पिकांची तर रब्बी हंगामात पेरणी होणार्‍या पिकांची स्थिती गंभीर झाली आहे. काढणीसाठी असलेली पिके सध्या पाण्यात असून यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यात 97 महसूल मंडलापैकी 61 महसूल मंडलात अतिवृष्टी झालेली आहे. यामुळे कापूस, सोयाबीन, बाजारी आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

कृषी विभागाकडून सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत झालेली अतिवृष्टी, ढगफुटीसदृष्य पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची आकडेवारी संकलित करण्याचे काम सुरू आहे. श्रीगोंदा तालुक्यातील नुकसानाची आकडेवारी येणे बाकी असून ती सोमवारी आल्यावर जिल्ह्यातील शेती पिकांच्या नुकसानीची माहिती समोर येणार आहे. दरम्यान, प्राथमिक अंदाजनूसार जिल्ह्यात एक लाख हेक्टरच्या जवळपास शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मंगळवारपर्यंत (दि.18) पावसाचा पुन्हा यलो अर्लट जारी केला आहे.

या काळात जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा मात्र ढगांच्या गडगटात पाऊस होण्याची शक्यता असून यामुळे शेती पिकांचे अजून नुकसान होणार आहे. पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर, तसेच पूर्व-मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनार्‍यालगत 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे कायम आहेत. उत्तर अरबी समुद्रात शुक्रवारी नव्याने चक्राकार वार्‍यांची स्थिती तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने वर्तविले आहेत.

पाऊस आतापर्यंत...

नगर 596.9, पारनेर 517.6, श्रीगोंदा 511, कर्जत 552.4, जामखेड 680.6, शेवगाव 551.1, पाथर्डी 572.2, नेवासा 511.3, राहुरी 539.8, संगमनेर 427.5, अकोला 587.2, कोपरगाव 486.6, श्रीरामपूर 581.2, राहाता 520.4 (आकडे मि.मी.मध्ये)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com