हवामान खात्याच्या इशार्‍याने नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ

भंडारदरात पुन्हा पाऊस बरसला
हवामान खात्याच्या इशार्‍याने नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ

पुणे |प्रतिनिधी| Pune

पुढील पाच दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील पाच दिवसांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर 14 एप्रिल पर्यंत मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामध्ये धुळे, नाशिक व नगर येथे गारपिटीसह पावसाचा इशारा दिला असून, उर्वरित भागात सोसाट्याच्या वार्‍यासह हलका ते मध्यम पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गत आठवड्यातही नगर जिल्ह्यात गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार या आस्मानी संकटात जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले होते.

13 एप्रिल रोजी कोकणात आणि 14 एप्रिल रोजी मराठवाड्यात गारपीट होणार असल्याचा अंदाज आहे. शनिवारी 15 एप्रिलच्या रात्रीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवसांत देशातील अनेक भागांतील कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होईल. तर आजपासून पश्चिम बंगालमध्ये आणि उद्यापासून ओडिशामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

पुणे व परिसरातील पुढील चार दिवसांच्या हवामान अंदाजानुसारआकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमारास आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत मेघगर्जना, विजांचा कडकडाट तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताआहे. चार दिवस पुणे परिसरात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पावसाबरोबरच गारपिटीची शक्यताही वर्तवली आहे.

बंगालच्या उपसागरातून येणार्‍या बाष्पयुक्त वार्‍यांमुळे आगामी चार दिवसांत धुळे, नगर,नाशिक येथे गारपीट, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. सध्या राज्यात कमी दाबाचा पट्टा कायम आहे. तसेच बंगालच्या उपसागराकडून बाष्पयुक्त वारे वाहत राज्यात येत आहेत, त्यामुळे दिवसभर कडक ऊन तर सायंकाळी सोसाट्याच्या वार्‍यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

भंडारदरात पुन्हा पाऊस बरसला

भंडारदरा वार्ताहराने कळविले की, अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण परिसरात काल रात्री 8.45 च्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे सखल भागात पाणीच पाणी झाले होते. काही ठिकाणी पिकांनाही फटका बसला आहे.यापूर्वीही दोन वेळा या भागात अवकाळी पाऊस बरसला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com