धरणांच्या पाणलोटाला जोरदार पावसाची आस

दारणा 35, भावली 32 तर गंगापूर 38.17 टक्क्यांवरc
धरणांच्या पाणलोटाला जोरदार पावसाची आस

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

गंगापूर धरणाच्या पाणलोटात पावसाच्या हालक्या सरींचे आगमन होत आहे. या धरणात 38.17 टक्के पाणीसाठा आहे. दुसरीकडे दारणा धरणाच्या पाणलोटात मध्यम स्वरुपाचा पाऊस अधून मधून सुरू असल्याने या धरणातील साठा 35 टक्क्यांवर पोहचला आहे. तर भावली 32 टक्के भरले आहे.

दारणा धरणाच्या पाणलोटात सह्याद्रीच्या डोंगररांगा आहेत. सह्यद्रीच्या घाटमाथ्यावर पडणारा पावसाचे पाणी सरळ दारणाच्या कुशीत विसावते. त्यामुळे दारणातील पाणीसाठा कासवगतीने का होईना फुगू लागला आहे. त्या तुलनेत गंगापूर, मुकणे हे सपाटीवर असल्याने या धरणे भरण्यास उशीर लागतो. दारणात 20 दिवसात 15 टक्के नव्याने पाणी दाखल झाले आहे. काल सकाळी 6 वाजता संपलेल्या 24 तासांत दारणाच्या भिंतीजवळ 17 मिमी पावसाची नोंद झाली. या धरणाच्या पाणलोटातील घोटी येथे 29 तर इगतपुरी येथे 25 मिमी पावसाची नोंद झाली. शेजारच्या भावलीला 44 मिमी पावसाची नोंद झाली. 7149 दशलक्षघनफूट क्षमतेच्या दारणात काल सकाळी 2448 दशलक्षघनफूट पाणी साठा तयार झाला होता. 7 टिएमसीच्या या धरणात जवळपास 2.5 टिएमसी पाणी साठा आहे. भावली धरणात 31.96 टक्के पाणीसाठा आहे.

गंगापूर धरणाच्या पाणलोटातही पावसाचा म्हणावा असा जोर नाही. काल या धरणाच्या भिंतीजवळ 15 मिमी पावसाची नोंद झाली. या धरणाच्या पाणलोटातील त्र्यंबक येथे 8, अंबोलीला 6, असा किरकोळ पाऊस झाला. 5630 क्षमतेच्या या धरणात 2149 दलघफू पाणीसाठा आहे. दोन टिएमसीहून अधिक पाणी आहे.

अन्य धरणांच्या क्षेत्रातील पाऊस असा- वाकी 11, भाम 24, वालदेवी 3, कश्यपी 12, गौतमी गोदावरी 10, कडवा 10, आळंदी 6 मिमी असा पाऊस नोंदला गेला. सोमठाणा 3 मिमी वगळता गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात पावसाने हजेरी लावली नाही. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात तसेच बिगरलाभक्षेत्रात मान्सून अद्यापि दाखल नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. खाली जायकवाडी धरणात उपयुक्तसाठा 25 टिएमसी इतका आहे. म्हणजेच हे धरण 33 टक्क्यांवर स्थिर आहे.

पूर्व निश्चित केलेल्या एकूण 14 पैकी 60 टक्के पर्जन्यमापक केंद्रांवर सलग दोन दिवस 2.50 मीमी पाऊस पडला की केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस आल्याचे जाहीर केले जाते. मान्सून केरळात प्रथम येऊन नंतर देशभरात जातो. मान्सूनचा पाऊस ज्या पद्धतीने पडतो, तसा तो यावर्षी मुळीच पडलेला नाही. त्यात मान्सून पूर्व म्हणजे वळवाच्या पावसाचेच गुणधर्म दिसले. मे महिन्यातील दुसर्‍या आठवड्यात आलेले अरबी समुद्रातील तौक्ते आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आलेले बंगालच्या उपसागरातील यास या चक्रीवादळांनी मान्सूनचे वेळापत्रक एकदम बदलून टाकले आहे. अत्यंत मोजक्या भागात, हा पाऊस वळवाच्या पावसासारखा धुवांधार कोसळला आणि आकाश निरभ्र होऊन सूर्य तळपायला लागला. ज्या शेतकर्‍यांनी यावर विसंबून पेरणी केली, त्यांच्यापुढे दुबारपेरणीचे संकट आता आ वासून उभे राहिले आहे. वळवाच्या रुपात असलेल्या पावसाला नियमित मान्सून असल्याचे जाहीर केल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. वातावरणीय बदल होऊन, मान्सूनचे हे विस्कळीत झालेले वेळापत्रक सुरळीत व्हायला जुलै महिन्याची वाट पहावी लागेल असे सध्याचे चित्र आहे. जागतिक हवामान बदलाचा झटका यापुढेही अशाच स्वरुपात समोर येत राहील. त्यामुळे पेरणीची पारंपरिक घाई करण्यापेक्षा, पिकात बदल करणे जादा संयुक्तीक राहील.

- उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com