
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात विविध विकास कामांची घोडदौड कायम आहे. तालुक्यातील निमगाव जाळी, चिंचपूर खु, चिंचपूर बु, सादतपूर व औरंगपूर या गावांसाठी जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजनांसाठी 33 कोटी 96 लाख 76 हजार रुपये मंजूर झाल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात व सोमनाथ जोंधळे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना जोंधळे म्हणाले की, करोनाच्या संकटानंतर नामदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील विविध विकास कामांसाठी महाराष्ट्र सरकार मधून मोठ्या प्रमाणात निधी मिळवला आहे. यामधून सातत्याने वाडी-वस्तीवर विकासाची कामे सुरू आहेत. नुकतेच जल जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत विविध जिल्हा परिषद सदस्यांच्या पाठपुराव्यामुळे तळेगाव, कुरकुंडी, म्हसवंडी, भोजदरी, जांबुत, पिंपळगाव देपा, पारेगाव खुर्द, वाघापूर, जोर्वे गावांसाठी 11 कोटी 99 लाख 17 हजार रुपयांचा निधी मिळविला आहे.
तर आता पुर्वेकडील महत्त्वाचे गाव निमगांवजाळी, चिंचपूर खुर्द, चिंचपूर बुद्रुक, सादतपूर व औरंगपूर या गावांच्या पाणी पुरवठा योजनांसाठी 33 कोटी 96 लाख 76 हजार रुपये मंजूर झाले आहे. या निधीसाठी विजय हिंगे, सोमनाथ जोंधळे, सौ. प्रतिभा जोंधळे, किरण बोरसे, अनिल थेटे, विवेक तांबे, दत्तात्रय तळोले, लक्ष्मण डेंगळे आदींनी पाठपुरावा केला.
या निधी मंजुरीचे पत्र पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी महसूलमंत्री ना. थोरात यांचेकडे दिले असून या योजनांच्या पाठपुरावा कामी नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, यशोधन कार्यालयाचे प्रमुख इंद्रजित थोरात यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेमुळे नागरिकांना वेळेत व सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे.