
पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेतील महाराष्ट्र जलजीवन मिशन संदर्भात विशेष बैठक आयोजित करण्यात आलेली होती. अध्यक्षस्थानी सरपंच डॉ. धनंजय धनवटे होते.
यावेळी सहाय्यक अभियंता शेखर मिटकरी यांनी नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी 15 कोटी 62 लाख रुपये शासनाकडून मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यापैकी 9 कोटी 34 लाख रुपयाची निविदा निघालेली आहे. यामध्ये तळ्याचे खोलीकरण करणे, गाळ काढणे, कागद टाकणे, नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प आदी संदर्भात माहिती दिली.
परंतु जुनी साडेसतरा कोटी रुपयाची पाणीपुरवठा जलस्वराज्य योजना अजून पूर्ण झालेली नाही. त्यात असंख्य त्रुटी आहेत. ती अजून हस्तांतरित झालेली नसून जोपर्यंत जल स्वराज्य योजना पुणतांबा ग्रामस्थांची विना हरकत पूर्ण होत नाही तोपर्यंत नवीन जलजीवन योजना सुरू करू नये, असे सुहास वहाडणे, सुभाष वहाडणे, चंद्रकांत वाटेकर, अनिल नळे, सदाशिव वहाटोळे यांनी सहाय्यक अभियंता यांना स्पष्ट सांगितले.
नवीन जलजीवन योजना सुरू करायची असल्यास फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत ग्रामसभा घेण्यात यावी. त्या ग्रामसभेस जुन्या पाणी योजनेतील मुख्य अभियंता, सहाय्यक अभियंता, ठेकेदार यांनी ग्रामसभेत ग्रामस्थांना सर्व माहिती द्यावी. कारण जुनी पाणी योजनेतील त्रुटी दूर झाल्या नाही तर शासनाचा व जनतेचा पैसा वाया जाईल, असे सुहास वहाडणे यांनी सांगितले त्यांच्या माहितीने ग्रामस्थांचे समाधान झाले तरच नवीन योजना कार्यान्वित करावी, असे संबंधित सहाय्यक अभियंता यांना सांगितले.
या बैठकीस सरपंच डॉ. धनवटे, ग्रामविकास अधिकारी प्रमोद कानडे, विजय धनवटे, डॉ. अविनाश चव्हाण, अनिल नळे, चंद्रकांत वाटेकर योगेश घाटकर, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष दत्तात्रय धनवटे, प्रताप वहाडणे, सदाशिव वहाटोळे, संध्याताई थोरात, ज्योतीताई पवार, स्वाती टोरपे ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.