पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबतच्या आरोप-प्रत्यारोपांनी ग्रामसभा गाजली

पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबतच्या आरोप-प्रत्यारोपांनी ग्रामसभा गाजली

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

जलस्वाराज टप्पा क्र. 2 अंतर्गत सुरु असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबत अनेक त्रुटी असून आरोप-प्रत्यारोप करून यासाठी पाणी योजनेवर विशेष ग्रामसभा घेण्यात यावी, असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला. या पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबतच्या आरोप-प्रत्यारोपांनी ही ग्रामसभा गाजली.

ग्रुप ग्राम पंचायतीच्या सभागृहात ग्रामसभा मंगळवारी पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच डॉक्टर धनंजय धनवटे होते. ग्राम सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन वरिष्ट लेखनीक कुमार हासे यांनी केले. विषय पत्रिकेवरील विषय ग्रामसभेत मांडण्यात आले त्यानंतर जलस्वराज टप्पा क्रमांक दोन अंतर्गत सुरू असलेले पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे चालू असून योजनेच्या कामाबाबत तक्रारी असून योजनेच्या कामावरून आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे योजनेच्या कामाबाबत विशेष ग्रामसभा घ्यावी, असा ठराव विकास आघाडीचे धनंजय जाधव यांनी मांडला.

त्यावर शिवसेनेचे सुहास वहाडणे कामगार नेते सुभाष कुलकर्णी भाजपचे सुभाष वहाडणे, राष्ट्रवादीचे बाळासाहेब चव्हाण मनसेचे संदिप लाळे यांनी भाग घेऊन पाणी योजनेच्या कामा बाबतच्या तक्रारींचा पाढा वाचला. त्यामुळे पाणी योजनेचे कामाचे लेखाजोखा जीवन प्राधिकरणाचे अधिकारी संबंधित ठेकेदार यांना बोलावून ग्रामसभेत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी सरपंच डॉक्टर धनवटे यांनी पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात सुरू असून योजनेतल्या काही त्रुटी असतील तर दुरुस्त केल्या जातील योजनेच्या कामावरून आरोप-प्रत्यारोप करणे चुकीचे असल्याचे सांगितले. शासकीय कर्मचार्‍यांनी नियुक्तीच्या ठिकाणी गावात राहावे असा ठराव ग्रामसभेत संमत झाला असताना देखील शासकीय कर्मचारी गावात राहत नाही. त्याबद्दल पत्रकार माधव ओझा यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला जाब विचारला संबंधित अधिकार्‍यांना लेखी दिल्याचे ग्रामपंचायतच्यावतीने सांगण्यात आले.

गावातील विविध प्रश्न तसेच वीज वितरण अधिकारी व कर्मचारी बाबत तक्रारी करण्यात आल्या यावेळी महाराष्ट्र वितरण कंपनीचे कनिष्ट अभियंता शीतलकुमार जाधव यांनी ग्रामस्थांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येईल. कर्मचार्‍याबद्दल लेखी तक्रार करावी, असे स्पष्ट केले शेतकर्‍यांच्या वीज रोहित्र बाबत शेतकर्‍यांनी तक्रार मांडली.

जनहित ग्रामीण विकास संशोधन सामाजिक संस्थेच्या वतीने विधवांना सन्मानाची वागणूक मिळावी असा ठराव या ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सेवनिवृत्त ग्राम पंचायत पाणी पुरवठा.कर्मचारी बाळासाहेब डेंगळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या ग्रामसभेला गणेशचे संचालक राजेंद्र थोरात सोसायटीचे अध्यक्ष सुधाकर जाधव, चंद्रकांत वाटेकर, गणेश बनकर, प्रताप वहाडणे, सुनील कुलट, संदीप लाळे, अनिल निकम, साहेबराव बनकर, किशोर वहाडणे ग्रामविकास अधिकारी प्रमोद कानडे, कामगार तलाठी लोखंडे, आधी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com