राहाता शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करावा

उपनगराध्यक्ष पठारे यांचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन
राहाता शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करावा

राहाता (प्रतिनिधी) - कोविड संकटकाळात नागरिकांची पाण्याची समस्या दूर व्हावी यासाठी चार दिवसांऐवजी दिवसाआड पाणी पुरवठा करावा, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना दिले आहे.

चार दिवसाआड पिण्याचे पाणी मिळत असल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक कुटूंबातील कोणीतरी व्यक्ती करोनावर रुग्णालयात उपचार घेत आहे. ज्या दिवशी नगरपालिका पाणी पुरवठा करते त्या दिवशी कुटूंबात पाणी भरण्यासाठी कोणीही नसेल तर पाण्यासाठी पुन्हा चार दिवस वाट पाहावी लागते. पाणी साठवणुकीची क्षमता प्रत्येक कुटूंबाकडे पुरेशी नसल्याने पाण्याची समस्या भेडसावते. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शिवसेनेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, नगरसेवक सागर लुटे, भागवत लांडगे यांनी मुख्याधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तर महाविकास आघाडीने प्रभाग निहाय कोविड लसिकरण मोहीम हातात घ्यावी, अशा आशयाचे निवेदन तहसिलदार कुंदन हिरे यांना दिले आहे.

ग्रामीण रुग्णालयात लसिकरणासाठी गर्दी होत असुन चार तास ताटकळूनही लस शिल्लक नसल्याने नागरिकांना घरी परतावे लागते. पुन्हा दुसर्‍या दिवशी रांगेत उभे राहावे लागते. तेथे गर्दीमुळे कोविड संक्रमण वाढू शकते. त्यामुळे प्रभागनिहाय लसिकरण करावे आणि नागरिकांचे हाल थांबवावे, अशी मागणी महाविकास आघाडीच्यावतीने तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर काँग्रेस तालुकाप्रमुख रावसाहेब बोठे , शहराध्यक्ष नितीन सदाफळ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष इरफान शेख, उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, नगरसेवक सागर लुटे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com