गॅस पाईपलाईन व मनपा कर्मचार्‍यांच्या सावळ्या गोंधळात पाणीटंचाई

निर्मल नगर, रेणावीकर कॉलनी परिसरात 15 दिवसांपासून नागरिकांचे हाल
गॅस पाईपलाईन व मनपा कर्मचार्‍यांच्या सावळ्या गोंधळात पाणीटंचाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

प्रभाग क्रमांक दोन मधील निर्मल नगर परिसरामध्ये गेल्या 15 दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. गॅस पाईप लाईन व मनपा कर्मचार्‍यांच्या सावळ्या गोंधळामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

याबाबत महापालिका कर्मचार्‍यांकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. पाणी टंचाईमुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून गॅस पाईपलाईन व महापालिका अंतर्गत विषय आहे. नागरिकांना यासंदर्भात काही देणे घेणे नाही. तुम्ही आपापसात विषय मार्गी लावून तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी पाणीपुरवठा अधिकारी परिमल निकम यांच्याकडे नगरसेवक निखिल वारे व नगरसेवक बाळासाहेब पवार यांनी केली.

यावेळी शांताबाई काळे, लताबाई खरात, शांताबाई ठोंबरे, सुनीता वनवे, रंजना जाधव, सुनीता लडकन, मुक्ता गीते, स्मिता कुलकर्णी, राधा बडे, राजश्री बागुल, जयश्री अल्हाट, वैशाली कराळे, सीमा साळवे, चंदा कार्ले, जया वाळेकर, कविता साळवे, रचना पतंग, प्रिया गार्डे, मंगल पालवे, मंदा दीक्षित, वर्षा टकले, सुनिता पवार, भाग्यश्री वाकोडे, हेमा गवळी, रेश्मा भोईटे आदींसह प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कचरा संकलन करणार्‍या ठेकेदाराची मुजोरी

महापालिका कचरा संकलन करणार्‍या ठेकेदाराची मुदत संपत येत असल्यामुळे नागरिकांच्या घरी जाऊन कचर्‍याचे संकलन केले जात नाही. वारंवार ठेकेदार कंपनीच्या कर्मचार्‍यांना फोन करूनही दहा-दहा दिवस घंटागाडी येत नाही. यामुळे संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक वारे यांनी उपायुक्त यशवंत डांगे यांच्याकडे केली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com