ब्राम्हणीसह सहा गावे व वांबोरी पाणीयोजनेच्या 131 कोटी 67 लाख निधीला मंजुरी- ना. तनपुरे

 प्राजक्त तनपुरे
प्राजक्त तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा विभागामार्फत जलजीवन मिशन योजने अंतर्गत राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी व इतर 6 गावांसाठी व वांबोरी परिसरातील वाड्यावस्त्यांकरीता प्रतिमाणसी 55 लिटरप्रमाणे मुळा धरणातून पाणी योजनेस शासनाच्या तांत्रिक समितीने मान्यता दिली असल्याची माहिती नगरविकास उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील वाड्या वस्त्यावरील तसेच ब्राम्हणी व इतर 6 गावे योजनेमध्ये चेडगांव, मोकळओहळ, उंबरे, कुक्कडवेढे, सडे व पिंप्रीअवघड या गावांचा समावेश आहे. त्यासाठी जलजीवन मिशन योजने अंतर्गत प्रस्ताव शासनास सादर केला होता. याबाबत विविध सूचना संबंधित अधिकार्‍यांना केल्या होत्या. याबाबत सर्व उच्चपदस्थ अधिकारी तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्याबरोबर संयुक्त बैठका घेण्यात आल्या. त्यानुसार अंतिम प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला. जलजीवन मिशन तांत्रिक समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या योजनेला तांत्रिक मान्यता दिली असून ब्राम्हणी व इतर 6 गावे या योजनेकरीता 73 कोटी 47 लक्ष रुपये निधीला व वांबोरी योजनेसाठी 58 कोटी 20 लक्ष रुपये निधीला तांत्रिक समितीने मान्यता दिली आहे. लवकरच त्या कामांची प्रशासकीय मान्यता मिळणार असल्याचे नामदार तनपुरे यांनी सांगितले.

राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी, उंबरे, चेडगांव, कुक्कडवेढे, मोकळओहळ, सडे, पिंप्रीअवघड या गावांमध्ये पाणीपुरवठा योजना नव्हती. या गावातील नागरिकांची बर्‍याच वर्षापासून पाणीयोजनेची मागणी होती. महाविकास आघाडी सरकार येताच या योजनेच्या मंत्रालय स्तरावर मंत्री तनपुरे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करुन बैठका घेऊन या योजना तांत्रिक समितीच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आल्या. नुकतीच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या पाणी योजनांना तांत्रिक मान्यता दिलेल्या आहेत.

लवकरच पुढील प्रशासकीय मान्यता होऊन पुढे लवकरात लवकर निविदा प्रक्रिया होणार असल्याचे नामदार तनपुरे यांनी सांगितले. या नवीन योजनेमुळे ब्राम्हणी, उंबरे परिसर व वांबोरी परिसर या भागातील पाणी प्रश्न कायमस्वरुपी मिटणार असल्याने निवडणुकीपूर्वी नामदार तनपुरे यांनी या भागातील नागरिकांना योजना मंजूर करण्याचा शब्द दिल्याप्रमाणे योजनेच्या मंजुरीमुळे ब्राम्हणी व इतर 6 गावे परिसरातील तसेच वांबोरी व वांबोरी परिसरातील नागरिकांनी मंत्री तनपुरे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com