पाणी योजनांसाठी 18 कोटी 55 लाख

अकोले तालुक्यातील 3 तर पारनेरमधील 2 गावांचा पाणी प्रश्न मिटणार
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकारच्या पाणीपुरवठा विभागाने नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील तीन आणि पारनेर तालुक्यातील दोन अशा पाच पाणी योजनांना जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे या पाच गावातील पाणी प्रश्न मिळणार असून या पाच योजनांसाठी 18 कोटी 55 लाखांच्या निधीला मंजुरी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी याबाबतचा शासन निर्णय पाणी पुरवठा विभागाने काढला आहे.

नगर जिल्ह्यातील पाच पाणी पुरवठा योजनांचा दरडोई खर्च हा विहीत निकषांपेक्षा जास्त असल्यामुळे याठिकाणी नवीन पाणी योजनांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी राज्य सरकारच्या पाणीपुरवठा विभागाकडे मंजुरीसाठी पाठवले होते. ग्रामीण भागात प्रत्येक घरातील व्यक्तीला दरडोई 55 लिटर प्रमाणे पाणी मिळावे, यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्यातून राष्ट्रीय जलजीवन मिशन कार्यक्रम सुरू आहे. या मिशनसाठी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी पाण्याची गुणवत्ता आणि देखभाली संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

त्यानुसार अकोल तालुक्यातील खिरेविरे गावासाठी 4 कोटी 30 लाख 5 हजारांची, केळी, ओतूर गावसाठी 4 कोटी 18 लाख 83 हजारांची, कोंभाळणे गावासाठी 2 कोटी 36 लाख 80 हजारांची तर पारनेर तालुक्यातील खडकवाडी गावासाठी 3 कोटी 78 लाख 53 हजार व शिरापूर गावाला 3 कोटी 91 लाख 52 हजार रुपयांच्या पाणी योजनांना मंजूरी देण्यात आली आहे.

या योजनांची कामे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात येणार असून योजना पूर्ण झाल्यावर एका महिन्यांत संबंधीत ग्रामपंचायतीला हस्तांतरण करावी लागणार असून योजना पूर्ण झाल्यावर वर्षभर योजना तयार करणार कंत्राटदार यांना चालवावी लागणार आहे. मात्र, संबंधीत ग्रामपंचायत यांना त्या वर्षभरातीन पाणीपट्टी नळ जोडणीधारक यांच्याकडून वसूल करावी लागणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com