
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
कोपरगाव शहराचा बिकट झालेला पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पूर्ण करून शरद पवार यांच्या मदतीने 5 नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी 131.24 कोटी निधी मिळविला आहे. त्याचबरोबर वाढीव पाणी देखील मंजूर करून घेतले. मात्र या अत्यंत महत्त्वाच्या पाणी योजनेला विरोधक अप्रत्यक्षपणे न्यायालयीन आडकाठी आणण्याचे पाप करीत असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करून पाणी योजनेला आडवे येण्याचे पाप कुठे फेडणार? असा प्रश्न कोल्हे यांचे नाव न घेता राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी केला आहे.
ना. आशुतोष काळेंच्या प्रयत्नांना मिळालेल्या यशातून 5 नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी 131.24 कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. तसेच 5 नंबर साठवण तलाव मोठा असल्यामुळे या साठवण तलावासाठी वाढीव पाणी आरक्षित करण्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळविली आहे.मात्र विरोधक पडद्या मागून शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप करीत असून न्यायालयाच्या माध्यमातून आडकाठी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र न्यायालयाने विरोधकांचे हे मनसुबे उधळून लावत त्यांनी केलेली याचिका फेटाळली आहे.त्या पार्श्वभूमीवर संदीप वर्पे बोलत होते.
ते म्हणाले, शहरातील नागरिकांचा पाणी प्रश्न मार्गी लागला असताना विरोधक या पाणी योजनेला अडथळा आणत आहे. एकीकडे कळवळा दाखवायचा व दुसरीकडे कुटनिती वापरून आपल्या धारणगाव, ब्राम्हणगाव गावातील कार्यकर्त्यांकरवी न्यायालयात पाच नंबर साठवण तलाव, प्रसिद्ध झालेली निविदा व मंजूर करण्यात आलेले वाढीव पाणी आरक्षण स्थगित करावे, अशा आशयाची याचिका दाखल करायची असे असे दुटप्पी धोरण विरोधक घेत आहे. या धोरणाचा महाविकास आघाडीच्यावतीने निषेध करत असल्याचे वर्पे यांनी सांगितले,
विरोधक तोंडावर एक आणि मागे एक अशी दुटप्पी भूमिका घेऊन शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवत आहेत. हे त्यांचे अघोरी पाप आहे. हे पाप कुठं फेडणार, असा सवाल संदीप वर्पे यांनी उपस्थित केला आहे.
विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा गळून पडला असून शहरातील नागरिकांना पाण्यापासून कोण वंचित ठेवत आहे याची नागरिकांना न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यामुळे प्रचिती आली आहे. यावेळी अॅड. विद्यासागर शिंदे यांनी न्यायालयीन बाजू मांडून माहिती दिली. यावेळी सुनील गंगूले, वीरेन बोरावके, मंदार पहाडे, नवाज कुरेशी, तुषार पोटे, भरत मोरे, प्रफुल्ल शिंगाडे, रमेश गवळी, कृष्णा आढाव, अॅड. विद्यासागर शिंदे, राजेंद्र वाकचौरे, चंद्रशेखर म्हस्के, फकिर कुरेशी, राहुल देवळालीकर, वाल्मीक लहिरे, सलीम पठाण, संदीप कपिले, दिनकर खरे, प्रकाश दुशिंग आदी उपस्थित होते.