
बेलापूर |वार्ताहर| Belapur
बेलापूर (वार्ताहर)- ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजनेसह सामाजिक उपक्रमांसाठी जागा बक्षिसपत्र करून देण्यासाठी तात्काळ सात बारा उतार्यावर नावे लावण्यात यावीत. अन्यथा येत्या 26 जानेवारी रोजी श्रीरामपूर येथील गांधी पुतळ्याजवळ आमरण उपोषण करण्याचा इशारा मेहेत्रे बंधूंच्यावतीने महसूल प्रशासनाला देण्यात आला आहे.
येथील टिळकनगरलगत राहत असलेले खंडकरी शेतकरी सर्वश्री प्रकाश मेहेत्रे, अशोक मेहेत्रे व नामदेव मेहेत्रे बंधूंनी तहसीलदार श्रीरामपूर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही स्व. मुरलीधर गणपत मेहेत्रे यांचे वारस असून महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार आम्हाला मोजणी करून 5-6 वर्षांपूर्वी जमिनी ताब्यात मिळाल्या व त्या आम्ही कसवत आहोत. टिळकनगर डिस्टीलरीमुळे आमच्या भागातील विहिरींचे पाणी दूषित झाल्याने ते पिण्यास अयोग्य आहे. सध्या बेलापूर ग्रामपंचायतीची पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर झाली आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीने केलेल्या मागणीनुसार आम्ही त्यासाठी आमच्या जमिनीतील काही भाग देण्यास तयार आहोत.
तसेच या आधी आम्ही जिल्हा परिषदेची बालवाडी आणि अनाथाश्रमाला जागा दिली आहे. मात्र सदर जमिनीच्या उतार्यावर सात बाराची नोंद न झाल्याने बक्षिसपत्र करून देण्यासाठी तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. जागेच्या उपलब्धतेअभावी सदरची पाणी योजना रद्द झाल्यास या भागातील लोकांना पिण्यायोग्य पाण्यापासून कायमचे वंचित राहावे लागणार आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा करुनही भूमि अभिलेख कार्यालयातील संबंधित अधिकारी आमच्या वाट्याला आलेल्या क्षेत्रावर आमच्या नावाच्या नोंदी लावण्यास सातत्याने टोलवाटोलवी व टाळाटाळ करीत आहेत.
तरी आमच्या मागणीचा विचार करुन तात्काळ सातबाराच्या नोंदी लावण्यात याव्यात. अन्यथा येत्या 26 जानेवारी 2023 रोजी श्रीरामपूर येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आमरण उपोषणाचा इशाराही या निवेदनाद्वारे मेहेत्रे बंधूंनी दिला आहे. त्याच्या प्रती महसूलमंत्री, तसेच वरिष्ठ महसूल व पोलीस प्रशासनाला पाठविण्यात आल्या आहेत.