राज्य सरकार पाडण्यासाठी भाजपचे सुडाचे राजकारण

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा आरोप
राज्य सरकार पाडण्यासाठी भाजपचे सुडाचे राजकारण

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाला बदनाम करून राज्य सरकार पाडण्यासाठीच ईडी, सीबीआय व आयटी यंत्रणांना हाताशी धरून भाजपा कारवाई करण्यास सांगत सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला.

राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍यात पारनेर येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पाटील बोलत होते. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना तसेच भाजप सोडून गेलेल्या नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं उदाहरण घेतले तर ज्या जागेसंबंधी आरोप आहे, त्या जागेची खरेदी त्यांच्या जावयाकडून रितसर झाल्याचे दिसून येत आहे. त्यांनीही बँकेचे कर्ज काढून ती घेतली. कर्जाची परतफेडही हप्त्याने केली आहे. त्यामुळे येथे काळ्या पैशाचा संबंध येतोच कुठे, असे असूनही खडसे यांच्यावर त्यासंबंधीचे आरोप करण्यात येत आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.

कार्यकर्त्यांनी एकसंधपणे पक्ष संघटना वाढवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पक्षाची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहनही पाटील यांनी केले. राळेगण-सिद्धी परिसर व पठारी भागाला पाटाचे पाणी देण्यासाठी आ. लंके यांचा पाठपुरावा सुरू आहे. यासाठी आपणही प्रयत्नशील असल्याचे आश्वासनही पाटील यांनी दिले.

यावेळी आ. निलेश लंके, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड, पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, अशोक सावंत,संजय मते, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, जितेश सरडे,सुभाष लोंढे, गजानन भांडवलकर, विक्रमसिंह कळमकर,मयुरी औटी, उमाताई बोरुडे, पूनम मुंगसे,बाळासाहेब खिलारी, अ‍ॅड.राहुल झावरे,विजुभाऊ औटी सुदाम पवार,नंदकुमार औटी, अशोक रोहोकले, डॉ. बाळासाहेब कावरे आदी उपस्थित होते.

किरीट सोमैय्यांना आधीच माहिती मिळते

माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या बाबतीतही दुसर्‍या कोणाच्या तरी संभाषणातील उल्लेखावरून देशमुख यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. असे आरोप होत असले तरी आम्ही डगमगणार नाही असे सांगत भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांना या सर्व यंत्रणांच्या कारवाईची माहिती आधीच कशी मिळते? हेच संशयास्पद आहे, असेही पाटील म्हणाले.

Related Stories

No stories found.