
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
तालुक्यातील वासुंदे व कर्जुले हर्या येथे मार्डओहोळ धरण परिसरातील शेतकर्यांच्या पाणबुडी मोटारीच्या जोडलेल्या केबलच्या रात्रीच्या वेळी चोरी झाल्या होत्या. याप्रकरणी पारनेर पोलिसांनी कारवाई करीत चोरांना मुद्देमालासह जेरबंद केले आहे.
मांडओहोळ धरणावर शेतीसाठी पाणी उपसा करण्यासाठी बसविलेल्या पाणबुडीला जोडलेल्या विद्युत केबलची चोरी झाल्याची फिर्याद वासुंदे येथील दत्तात्रय विठ्ठल गायके यांनी दिली होती. यामध्ये 13 शेतकर्यांच्या केबल चोरीला गेल्या होत्या. याबाबत मच्छिंद्र झुंबर मधे, बबन भानुदास घोगरे, प्रेमराज मधे, तानाजी मधे (सर्व रा. ठाकूरवाडी, वनकुटे) यांच्याविरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पथके तैनात करून केबल चोरणार्या टोळीला जेरबंद केले. त्यांच्याकडून 70 हजार रुपयांच्या केबल जप्त केल्या आहेत. या पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय ठाकूर, हेडकॉन्स्टेबल बी. बी, गवळी, साठे, खेमनर आदींचा सहभाग होता.