गोदावरी खोऱ्यात पाणी वळविण्याला सरकारचा प्राधान्यक्रम

जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांची ग्वाही
गोदावरी खोऱ्यात पाणी वळविण्याला सरकारचा प्राधान्यक्रम

नेवासा | तालुका प्रतिनिधी

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी (Water of western channel rivers) गोदावरी खोऱ्यात (Godavari valley) वळविण्याला महाविकास आघाडी सरकारचा (Maha Vikas Aaghadi Govt) प्राधान्यक्रम असून लवकरच आपल्याला गोदावरी खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याचे दिसेल अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंतराव पाटील (Minister Jayantrao Patil) यांनी दिली.

जलसंपदा मंत्री हे तालुका दौऱ्यावर आले असता भेंडा येथे जलमित्र-पत्रकार सुखदेव फुलारी व मृद शास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे यांनी पश्चिम वाहिनी नद्या व सह्याद्री घाट माथ्यावरील पावसाचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचे मागणीचे निवेदन दिले. यावेळी माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, डॉ.क्षितिज घुले पाटील, काशिनाथ नवले उपस्थित होते.

ना.जयंतराव पाटील यांना दिलेल्या निवेदनात जलमित्र सुखदेव फुलारी व डॉ.ढगे यांनी म्हंटले आहे की, सह्याद्रीच्या पश्चिम घाट माथ्यावर दरवर्षी भरपूर पाऊस पडतो हे सर्व पाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते व वाया जाते. महाराष्ट्रातील गोदावरी खोरे हे पाण्याच्या संदर्भात तुटीचे खोरे आहे. त्यामुळे नाशिक-नगर विरुद्ध मराठवाडा हा पाणी संघर्ष वारंवार निर्माण होतो. जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी वाद उपस्थित होतात. त्यामुळे हा संघर्ष कायम स्वरूपी थांबविण्यासाठी पश्चिम वाहिनी दमणगंगा, पार, वैतरणा व उल्हास नद्यांचे पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

हे पश्चिम घाट माथ्यावरील वाहून जाणारे पावसाचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी जलसंपदा विभागाने 30 प्रवाही वळण योजना, 2 नदी जोड प्रकल्प, उपसा योजनेव्दारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणे इ. योजना हाती घेतलेल्या आहेत.

उत्तर कोकणातील नार-पार, दमणगंगा, वैतरणा व उल्हास नदी उपखोऱ्यात 370 अघफू अतिरिक्त पाणी शिल्लक आहे. त्यापैकी 115 अघफू पाणी गोदावरी खोऱ्यात कळविणे बाबतची तरतूद एकात्मिक राज्य जल आराखडयात करण्यात आली आहे. यापैकी 2.72 अघफू पाणी वापरण्याच्या पूर्ण/बांधकामाधिन वळण योजना 25.6 अघफू पाणी वापरासाठीच्या प्रकल्प अहवाल तयार असलेले वळण योजना व 140.43 अघफू पाणी वापरासाठी सर्वेक्षण प्रस्तावित योजना अशा एकूण 168.75 अघफू पाणी वापरासाठीच्या कोकणातून गोदावरी खोऱ्यात पाणी वळविण्यासाठीच्या योजनांची तरतूद दि.19 सप्टेंबर 2019 रोजीच्या शासन निर्णयामधे आहे. तरी या योजनांचे काम तातडीने हाती घेऊन त्या कार्यान्वयीत करून तुट असलेल्या गोदावरी खोऱ्यात प्राधान्याने पश्चिम घाट माथ्यावरील पाणी सोडून पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.

या मागणीच्या अनुषंगाने बोलताना ना.पाटील पुढे म्हणाले, पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी यंत्रणा उभी केलेली आहे. बऱ्याच प्रकल्पाला वनविभागाकडून परवानग्या मिळण्याचे बाकी आहे. दर आठवड्याला यावर बैठका होतात. विशेष मुख्य अभियंता व खालची अधिकारी यंत्रणा दिलेली असल्याने हे पाणी वळविण्याचे काम वेगाने होण्याला प्राधान्य देत आहोत. मांजरपाडा धरणातून आपण मोठे पाणी वळविले त्याचा फायदा झाला. मागील सरकारने वैतरणा व मुखड्याचे मध्ये एक भिंत बांधायचे ठरवले होते. त्यात 1 टीएमसीचे डिझाइन त्यात होते ते बदलून आम्ही 10 टीएमसी पाणी इकडे आणण्याचे डिझाईन करून त्याची निविदा काढून काम सुरू करतोय. हे 10 टीएमसी व त्याखालील उपसा करून 7 टीएमसी पाणी वैतरणात आणून ते गोदावरीत आणतो आहोत. मुळा धरणाचे मागे देखील 3-4 वळण बंधारे बांधून धरणात पाणी आणत आहोत. वन्यजीव प्रधाकरणाची परवानगी मिळताच पाणी उपलब्धतेचे परवाने आणि काम करायला सर्वेक्षण करण्याचे परवाने मिळतील. गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्याचा या सरकारने प्राधान्यक्रम दिलेला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com