
पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
परिसरात महावितरण वीज कंपनी कडून शेतीसाठी दिवसा व रात्री अखंडीतपणे वीजपुरवठा केला जात नसल्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी स्थिर आहे.
जानेवारी महिन्यातील दुसरा आठवडा संपत आलेला आहे. तरीही परिसरातील अनेक विहिरी अद्यापही पाण्याने तुडूंब भरलेल्या दिसून येत आहेत. त्यातच मागील वर्षी परिसरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. त्यामुळे पिकांना पाण्याची तातडीने गरज भाासलेली नाही. त्यातच महावितरण मार्फत जेव्हा दिवसा वीजपुरवठा केला जातो तेव्हा हमखास वीजपुरवठा खंडित होत असतो. तसेच परिसरातील अनेक भागात अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्यामुळे रब्बी पिकांना विहिरीमध्ये पाणी असूनही देता येत नाही. अशीच परिस्थिती रात्रीच्या वेळेस असते. मात्र दिवसापेक्षा रात्रीच्या परिस्थितीत काही अंशी किंचीतसा फरक असतो.
पुणतांबा परिसरात विजेचा पुरवठा विस्कळीत आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे ज्या कोपरगाव निघोज मुख्य वाहिनी वरून विद्युतपुरवठा केला जातो. ती वाहिनी अत्यंत जुनी असल्यामुळे सातत्याने तांत्रिक बिघाड होत असतो. त्यामुळे पुणतांबेकरांना सातत्याने विजेच्या अनियमिततेला सामोरे जावे लागते.
त्यातच पुणतांबा गाव राहाता तालुक्यात आहे. मात्र विधानसभेसाठी त्याचा कोपरगावात समावेश आहे. त्यामुळे या परीसरातील गावांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झालेली आहे. कोणीही पुणतांबा परिसरातील प्रश्नाची गांभिर्याने दखल घेत नाही. ना. शिंदे व ना. फडणवीस सरकारने शेतकर्यांना दिवसा अखंडितपणे वीजपुरवठा करण्याची भीम थाटात घोषणा केली होती. ती घोषणा हवेतच विरली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे. निदान 8 तास अखंडित वीजपुरवठा करण्याच्या घोषणेची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी मनसेचे राहाता तालुकाप्रमुख गणेश जाधव यांनी राज्य सरकारकडे केली आहे.