नेवासा तालुक्यातील टेलच्या भागाला 30 वर्षानंतर सलग दुसर्‍यावर्षी पूर्ण दाबाने पाणी

नामदार गडाखांनी निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळला
नेवासा तालुक्यातील टेलच्या भागाला 30 वर्षानंतर सलग दुसर्‍यावर्षी पूर्ण दाबाने पाणी

देवगडफाटा (वार्ताहर) - नामदार शंकरराव गडाख यांच्या कुशल नियोजनामुळे नेवासा तालुक्याला मुळा धरणातून उजव्या कालव्याने पाटपाणी मिळाले. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही तालुक्याला विशेष करून टेलच्या भागाला पूर्ण दाबाने पाणी मिळाल्याने परिसरात उन्हाळ्यातही शेती फुलली आहे,परिसरातील शेती हिरव्यागार दिसत आहे तसेच अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला.

अनेक वर्षानंतर योग्य वेळेत पाटपाणी मिळाल्याने नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांनी आनंद व्यक्त केला आहे तसेच नामदार शंकरराव गडाख यांचे आभार मानले. योग्य नियोजन केल्याने गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षीही उन्हाळा जाणवला नाही. परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस, कांदा, गहू, भुईमूग, मका, भाजीपाला, जनावराचा चारा, फळबाग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न निघाले.

मुळा उजव्या कालव्याचे पाटपाणी खडका पाणी वितरीकेद्वारे येते. या वितरिकेवर 17 पाणी वापर सोसायट्या येतात परंतु ही वितरीका टेलला येत असल्याने दोन वर्षांपूर्वी कमी प्रमाणात पाटपाणी मिळत असल्याने 12 गावची शेती उजाड झाली होती. परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वी नामदार शंकरराव गडाख यांनी खडका येथे शिरसाठ वस्ती येथे खडका परिसरात 12 गावातील शेतकर्‍यांचा मेळावा घेतला होता व त्यात त्यांनी शेतकर्‍यांना शब्द दिला होता की मी जर आमदार झालो तर प्रथम शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्यास प्राधान्य देईन तसेच तालुक्यातील शेवटच्या भागाला पूर्ण दाबाने पाणी देण्यासाठी कटिबद्ध राहील असे आश्‍वासन दिले होते ते त्यांनी प्रत्यक्षात उतरविले.

खडका पाणी वितरिकेवर 1800 हेक्टर शेतीचे सिंचन होते. यात खडका, जळके खुर्द, जळके बुद्रुक, बकुपिपळगाव, मुरमे, मडकी, प्रवरासंगम, माळेवाडी, बाभुळखेडा, देवगडफाटा, म्हाळापूर व पिचडगावचा काही भाग आधी गावांना पाटपाणी मिळते.

शेतकरी व बागायतदारांच्या उन्हाळी शेतीच्या सिंचनासाठी असलेले आवर्तन तालुक्यात सोडण्यात आल्याने अनेक गावामधील विहीरी व कुपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. शेतकर्‍यांबरोबरच त्या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या पावसाळ्यापर्यंत दूर झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

नेवासा तालुक्यातील टेलच्या शेतकर्‍यांना शेतीसाठी पाणी कमी मिळत असल्याने गेल्या 25 वर्षात अनेक आंदोलने झाली. नामदार शंकरराव गडाख यांनी अनेक रस्ता रोको आंदोलन केले त्यात त्यांना अटक झाली होती.

नेवासा मतदार संघाचे लोक प्रतिनिधी शंकरगडाख त्यांनी या प्रकरणी लक्ष घालून त्यासाठी गेली तीनचार वर्षे विशेष प्रयत्न केल्याने पाटाच्या दुरूस्तीचे काम झाले व अधिकारी वर्गाशी बैठक घेऊन पाण्याचे योग्य नियोजन केले.

मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपविभागीय अभियंता महेंद्र राजगुरू, शाखाधिकारी श्री. पारखे, कालवा निरीक्षक शकील शेख, श्री. शिरसाठ यांनी वेळोवेळी लक्ष दिल्याने खडका वितरिकेला पूर्ण दाबाने पाणी दिल्याने 17 पाणी वापर सोसायट्यांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळाल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला.

2000 च्या क्युसेसने पाटपाणी 15 दिवस पूर्ण क्षमतेने चालल्यास या परिसरातील सिंचन पूर्ण होते.‘टेल टू हेड’ अशा प्रकारे हेडच्या भागाचे नियोजन केल्याने शेवटच्या भागाचे 100 टक्के इरिगेशन झाले त्यामुळे प्रथमच अनेक वर्षांनंतर शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले.

- महेंद्र राजगुरू मुळा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी

नामदार शंकरराव गडाख यांनी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी शेतकर्‍यांना दिलेला शब्द पाळला व परिसरातील शेती फुलली मोठ्या प्रमाणात शेतीचे उत्पन्न वाढले व शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला.

- संजय शिंदे शेतकरी, जळके खुर्द

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com