दगड आणि वजनी वस्तू ठेवून कचर्‍याचे वजन वाढवण्याचा गैरप्रकार उघड

दगड आणि वजनी वस्तू ठेवून कचर्‍याचे वजन वाढवण्याचा गैरप्रकार उघड

राहाता |प्रतिनिधी| Rahata

आर्थिक फायदा व्हावा या उद्देशाने कचर्‍याचे वजन वाढविण्यासाठी चक्क दगड आणि वजनी वस्तू भू-काट्यावर ठेवून वाहनांचे वजन करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार राहाता नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाच्या कचरा वाहनांसदर्भात उघडकीस आला आहे.

राहाता शहरातून घंटागाडी, ट्रॅक्टर अशा वाहनांतून ओला व सुका कचरा घरोघरी गोळा केला जातो. राहाता नगरपरिषदेने याकामी अनेक वाहने लावली आहेत. कचरा गोळा करणे तसेच त्याचे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी एका खासगी कंपनीला ठेका देण्यात आला आहे. शहरातून कचरा गोळा करून हा सर्व कचरा पिंपळवाडी शिवेवर डंपींग ग्राऊंडमध्ये नेला जातो. अगोदर कचरा वाहणार्‍या रिकाम्या वाहनांचे वजन केले जाते. त्यानंतर कचरा भरून आल्यानंतर पुन्हा वजन केले जाते आणि या वजनाच्या आधारे ठेकेदाराला रक्कम मिळते. मात्र गोळा केलेल्या कचर्‍यापेक्षा वजन वाढवून अधिक रक्कम उकळली जात आहे.

शहरातील कचरा गोळा करून ही वाहने वजनासाठी अस्तगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एका खासगी भू-काट्यावर वजन करण्यासाठी नेली जातात. त्यानंतर ती पुन्हा त्या ठिकाणाहून सात किमी अंतर असलेल्या नगरपालिकेच्या डंपींग ग्राउंडवर कचरा खाली करतात. वाहतुकीला इंधन खर्च तर वाढतोच शिवाय कचर्‍याचे वजन अधिकाधिक वाढावे यासाठी वाहनांच्या आसपास दगड, विटा व वजनी वस्तू ठेवल्या जातात. प्रत्येक वाहनामागे किमान शंभर ते दिडशे किलो वजन वाढवले जाते. अशा प्रकारे संगनमताने हा सर्व प्रकार गेले कित्येक दिवसांपासून सुरू आहे. हा सर्व प्रकार जनार्दन शेजवळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याचे मोबाईल चित्रीकरण केले.

दरम्यान नूतन मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी पदभार स्विकारल्यानंतर मात्र हा वजनवाढीचा प्रकार तूर्त थांबला आहे. हा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता, किती रकमेचा अपहार कचर्‍याची वजनवाढ करून करण्यात आला याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. मुख्याधिकार्‍यांनी पदभार स्विकाराताच कर्मचार्‍यांमधील मरगळ दूर करून अनेक कामात सुसूत्रता आणली आहे. राहाता शहरवासियांना त्यांचेकडून विकास कामाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. एकिकडे विकास कामे तर दुसरीकडे गैरप्रकार करणार्‍यांविरोधात कारवाई करण्याचे आव्हान नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी चंद्रकात चव्हाण यांच्या समोर आहे.

नगरपरिषद नागरिकांकडून विविध कर वसूल करते. त्यात स्वच्छता कर देखील वसूल होतो. आर्थिक फायद्यासाठी असा प्रकार होत असेल तर तो जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. पुढील काळात स्वच्छता कर वाढण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे या गैरप्रकाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.

कचर्‍यात होत असलेला वजनामधील भ्रष्टाचार निंदनीय आहे. संगनमताने हा गैरप्रकार सुरू असावा. वरपासून खालपर्यंत जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा व्हायला हवी. जनतेचा कराचा पैसा असल्याने मुख्याधिकार्‍यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून ठेकेदार, वजनकाटा चालक, वाहन चालक, स्वच्छता कर्मचारी जे कोणी दोषी आहेत त्यांचेवर कारवाई करावी.

- जनार्दन शेजवळ, सामाजिक कार्यकर्ते

अशाप्रकारे भ्रष्टाचार होतो ही खेदाची बाब आहे. राहाता नगरपरिषद प्रशासनाने या अगोदरही अनेक भ्रष्टाचार समोर आणले त्याची देखील चौकशी सुरू आहे. बोगस बिले काढणे, बोगस पगार काढणे असे प्रकारही घडले आहेत. कचर्‍याचे वजन वाढवून अधिक रक्कम उकळली जात असेल तर कायम कर्मचारी काय नियंत्रण ठेवतात? यात कोणालाही पाठीशी न घालता मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षा यांनी चौकशी करून कारवाई करावी.

- राजेंद्र पठारे, उपनगराध्यक्ष

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com