
कर्जत |प्रतिनिधी| Karjat
तालुक्यात विविध वॉरंटमध्ये न्यायालयात हजर न रहाणार्यांविरोधात मोहीम राबवून तब्बल 43 जणांना कर्जत पोलिसांनी अटक केली. यामध्ये 24 जमानती वॉरंट, 16 अटक वॉरंट तर 3 पोटगी वॉरंट मध्ये ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी न्यायालयातील तारखांना वेळोवेळी दांडी मारणार्या तब्बल 16 नागरिकांना मागील पंधरा दिवसांच्या कालावधीत अटक करून कर्जत, श्रीगोंदा, नगर तसेच आष्टी न्यायालयात हजर केले आहे. जमानतीचे वॉरंट असलेल्या 24 लोकांनाही अटक करून त्यांना जामीन दिला आहे. एवढंच नव्हे तर पोटगीची रक्कम न देणार्या तिघांना वॉरंट काढून न्यायालयासमोर उभे करून पिडितांना पोटगीची रक्कम मिळवून दिली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी अशा नागरिकांवर केलेली धरपकड अटक मोहिमेमुळे कायद्याचे उल्लंघन करणार्यांना धाक बसला आहे.
पोलीस ठाण्यांमध्ये विविध कलामांतर्गत गुन्हे दाखल होतात. गुन्हा न्यायालयात दाखल झाल्यानंतर न्यायालयाकडून संशयितांची जामिनावर सुटका होते. मात्र जामीन झाल्यानंतर संबंधित संशयित न्यायालयाने दिलेल्या तारखांना हजर राहत नाहीत. तारखांना गैरहजर राहिलेल्या नागरिकांना हजर करण्यासाठी न्यायालयाकडून पोलीस ठाण्याला वॉरंट दिले जातात. त्यानंतर पोलीस यंत्रणेमार्फत त्या वॉरंटची बजावणी केली जाते.
ज्यावेळी हे वॉरंट बजावूनही नागरिक न्यायालयीन तारखांना हजर राहत नाहीत त्यावेळी अनेक खटले प्रलंबित राहतात. या बाबीची दखल घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी अशा नागरिकांची अटक मोहीम हाती घेतली. सहाय्यक निरिक्षक बाळासाहेब यादव, पोलीस हवालदार बाळू पाखरे, पोलीस जवान दीपक कोल्हे यांची याकामी नेमणूक करून ही मोहीम राबवण्यात आली.
बेजबाबदारांना कायद्याचा धाक
अनेकवेळा गुन्हा घडल्यावर न्यायालयाकडून जामीन मंजूर केले जातात. जामीन कालावधीत व नंतरही संबंधितांनी तारखांना हजर राहणे बंधनकारक आहे. मात्र बहुतांश लोक तारखांना हजर राहत नाहीत. हजर नाही राहिले तरी काहीच होत नाही असा अनेकांचा समज आहे. मात्र चंद्रशेखर यादव यांनी सुरू केलेल्या अटक मोहिमेमुळे कायद्याचा धाक निर्माण होत असल्याची चर्चा आहे.