भिक्षेकरुंच्या बंदोबस्तासाठी उपोषणाचा इशारा

भिक्षेकरुंच्या बंदोबस्तासाठी उपोषणाचा इशारा

शिर्डीतील महाविकास आघाडीच्यावतीने मुख्याधिकार्‍यांना निवेदन

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डीतील अतिशय भयंकर वाढती भिक्षेकरुंच्या संख्येबाबत महाविकास आघाडीच्यावतीने मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले. यादरम्यान शाब्दिक चकमक झाल्याचा आरोप शिवसेनेचे कमलाकर कोते यांनी केला. या भिक्षेकरूंचा त्वरित बंदोबस्त न झाल्यास मुख्याधिकार्‍यांच्या दालनात उपोषणाला बसणार असल्याचा इशारा प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नगरपंचायत हद्दीत सध्या हजारो भिक्षेकरी वास्तव्यास असून या भिक्षेकर्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसनी व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असून या भिक्षेकर्‍यांच्या टोळ्या चालवण्याचे काम गुंड लोक करत आहेत. या भिक्षेकर्‍यांना पकडून साईबाबा संस्थानच्या इमारतीत वैद्यकीय तपासणी, व्यक्तिगत स्वच्छता, जेवण, चहापाणी, नाष्टा, कपडे याची सुविधा देऊन ठेवण्यात यावे. यासाठी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस निरीक्षक, शिर्डी नगरपंचायत, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व ग्रामस्थांची संयुक्त बैठक साईबाबा संस्थान मिटिंग हॉलमध्ये होऊन या कार्यवाहीसाठी संस्थान आणि शिर्डी पोलीस स्टेशन यांनी संपूर्ण सहकार्य करण्याचे कबूल केले.

तसेच विसापूर भिक्षेकरी गृह यांच्याशी पत्रव्यवहार केला. सत्ताधारी हे भिक्षेकर्‍यांची पाठराखण करत आहेत. ज्येेष्ठ नगरसेवकांसोबत गैरवर्तन होऊन सुद्धा नगरपंचायतकडून कुठलीही कार्यवाही होत नाही. या भिक्षेकरी टोळ्यांकडून नगरपंचायतीला निश्चित काहीतरी लाभ होत असावा असे वाटते. साईबाबा मंदिराच्या कळस दर्शन, मुख दर्शनासाठी येणार्‍या साईभक्तांना या भिक्षेकर्‍यांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. याच्या निषेधार्थ शिर्डी महाविकास आघाडीच्यावतीने उद्या गुरुवार दि. 22 जुुलै रोजी मुख्याधिकारी यांच्या दालनात उपोषणास बसणार असल्याचे म्हटले आहे.

याप्रसंगी शिवसेनेचेे कमलाकर कोते, राष्ट्रवादीचे रमेश गोंदकर, सुधाकर शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय शिंदे, राष्ट्रवादीचे शिर्डी शहराध्यक्ष महेंद्र शेळके, निलेश कोते, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, विजय जगताप, अमित शेळके, शिवसेना शहरप्रमुख सचिन कोते, राहुल गोंदकर, अमोल गायके, साई कोतकर, किरण माळी, अनिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

भिक्षेकरूंना ठेवण्यासाठी जागा उपलब्ध असेल तेथे ठेवले जाईल. याबाबत वेळोवेळी सदरील प्रश्नी नगरपंचायतचे मुख्याधिकारी तसेच सर्व नगरसेवक, प्रशासन आणि कर्मचार्‍यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. आमच्याकडून सदरील विषयावर कोणतेही गैरवर्तन तसेच अर्वाच्च भाषेत संवाद झालेला नसून आगामी नगरपंचायतीची निवडणूक जवळ आल्याने विरोधक जर अशाप्रकारे आरोप करत असतील तर ते दुर्दैव आहे.

- शिवाजी गोंदकर, नगराध्यक्ष

आम्ही शिर्डी शहर महाविकास आघाडीच्यावतीने शिर्डीतील भिक्षेकरी समस्यांंबाबत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेलो होतो. आम्हाला मुख्याधिकारी यांनी नगराध्यक्ष यांच्या दालनात बोलावले. तेथे आम्ही निवेदन दिल्यानंतर भिक्षेकर्‍यांची व्यवस्था करणे हे आमचे काम नाही, तुम्ही मुद्दाम वेगवेगळ्या विषयांवर येऊन आम्हाला निवेदन देतात, नगरपालिकेत कुत्रे आणून सोडतात, घरपट्टी, पाणीपट्टी, गाळा भाडे यासंदर्भात लोकांना घेऊन येतात. असे म्हणत दोघांनीही दादागिरीची भाषा वापरून अपमानास्पद वागणूक दिली असून या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो.

- कमलाकर कोते, शिवसेना नेते, शिर्डी विधानसभा

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com