वारीत बिबट्याचा धुमाकूळ

पाच कुत्रे केले फस्त
वारीत बिबट्याचा धुमाकूळ

वारी |वार्ताहर| Wari

कोपरगाव तालुक्यातील वारी येथे गत आठवड्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून आत्तापर्यंत पाच कुत्रे फस्त केले आहे. साखळीला बांधून ठेवलेला पाळीव कुत्रा बिबट्याने फस्त केल्याने नागरीकांमध्ये दहशत पसरली असून वनविभागाने पिंजरा लावुन हा बिबट्या तात्काळ जेरबंद करावा, अशी मागणी वारी ग्रामस्थांनी केली आहे.

वारी गावातील कोळ नदीच्या कडेला लांडगे वस्ती व शिरसाठ वस्ती वरून बिबट्याने पाच कुत्रे उचलून नेल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. गुरूवारी रात्री पोपट शिरसाठ यांच्या वस्ती वरून साखळीने बांधलेला कुत्रा बिबट्याने उचलून नेला. गेल्या वर्षी जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने त्यात समृद्धी महामार्गाला कोळ नदीतून माती उकरून नेल्याने नदीची साठवण क्षमता वाढली आहे. त्यामुळे परिसरात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात झाली.

बिबट्याला लपण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा झाली असून एक मादी व दोन बछडे यांचा संचार या परीसरात वाढला आहे. कधी तो रोडवरील जाणार्‍या वाहनांना आडवे जातात. त्यामुळे शेतात मजूर जाण्यास घाबत आहे. वन विभागाला याबाबत वारंवार कल्पना देऊन सुद्धा वनविभाग दुर्लक्ष करत आहे. वनविभागाने या परीसरात तात्काळ पिंजरा लावावा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा संदीप लांडगे, प्रदीप लांडगे, आप्पासाहेब लांडगे, कैलास लांडगे, गोरख लांडगे, श्रीनिवास टेके, महेश टेके, जालिंदर शिरसाठ, सुदाम शिरसाठ, बाबासाहेब थोरमिशे, पप्पू टेके, रमाकांत टेके आदी शेतकर्‍यांनी दिला आहे. बिबट्याला एखाद्या दिवशी शिकार भेटली नाही तर तो शाळकरी मुलांवर हल्ला करू शकतो अशी भीतीही परिसरातील नागरिक व्यक्त करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com