वारंघुशी फाट्यावर चार तास रस्ता रोको

आदिवासी भागातील शेतकर्‍यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करा, अन्यथा तीव्र आंदोलन
वारंघुशी फाट्यावर चार तास रस्ता रोको

अकोले |प्रतिनिधी| Akole

भात, सोयाबीन, वराई, कांदे पिकाचे अवकाळी पाऊस व किडीने मोठे नुकसान झाले असून पिकांचे सरसकट पंचनामे करा अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा आदिवासी शेतकर्‍यांनी दिला. आदिवासी विकास परिषद, पेसा सरपंच परिषद, भाजप यांच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत आदिवासी भागातील 12 गावच्या शेतकर्‍यांनी वारंघुशी फाट्यावर चार तास रस्ता रोको आंदोलन केले.

यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी आपल्या कुटुंबीयांसह रस्ता रोको मध्ये सहभागी झाले होते. घोषणा देत व क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून शेतकर्‍यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आपल्या मागण्या मांडल्या.

यावेळी आदिवासी उन्नती संस्थेचे अध्यक्ष भरत घाणे, भाजपचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, पंचायत समितीचे उपसभापती दत्ता देशमुख, विजय भांगरे, सुरेश भांगरे, सुरेश गभाले, तुकाराम खाडे, सुनील सरुकते, सरपंच पांडुरंग खाडे, महादू बिण्णर, पंचायत समिती सदस्या अलका अवसरकर, जयराम ईदे, दगडु पाटील पांढरे, डॉ. अनंत घाणे, महिला बचत गट सदस्या व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

याप्रसंगी भरत घाणे यांनी गेली दोन महिन्यापासून आम्ही तालुका कृषी अधिकारी, महसूल विभाग यांना निवेदन देऊन व प्रत्यक्ष पाहणी करण्यास बोलावून नुकसान दाखवली मात्र अधिकारी यांनी पंचनामे केले नाही. विजेचे बिल भरले नाही म्हणून वीज कट केली, विम्याची भरपाई नाही, धान खरेदी केंद्र सर्व जिल्ह्यात सुरू मात्र आपल्याकडे नाही. त्यामुळे आमची कुणी दखल घेत नाही पाहून आम्ही नाविलाजास्त हा रस्ता रोकोचा निर्णय घेतला आहे. राज्यातील आघाडीचे सरकार गरिबांचे नाही तर ते गांजा अफू विक्री करणार्‍यांचे सरकार आहे. विजय भांगरे यांनी सरकार विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

दोन दिवसात पंचनामे केले नाही तर शेतकरी तहसीलदार कचेरीवर जाऊन आंदोलन करतील, पंचायत समितीचे उपसभापती दत्ता देशमुख यांनी कृषी अधिकारी हे शेतकर्‍यांची दिशाभूल करत असून अधिकार्‍यावर कारवाई करावी. तर दगडु पांढरे पाटील यांनी गेली अनेक वर्षे आदिवासी समाजावर अन्याय होत असून या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम आदिवासी हातात टिकुरे घेऊन करतील याचे भान सरकार व प्रशासनाने ठेवावं तर भाजपचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे यांनी तालुक्यातील शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होऊनही लोकप्रतिनिधी लक्ष्य देत नाही ही शोकांतिका आहे. केवळ वसुली सुरू असून गरिबाचे स्वस्त धान्य काळ्या बाजारात विकण्यासाठी नेले जात आहे. यावेळी विद्यमान लोकप्रतिनिधी डॉ. लहामटे व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली.

यावेळी तालुका कृषी अधिकारी माधव हासे यांनी तातडीने पंचनामे करून तसेच सरसकट नुकसान भरपाई देण्याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यांना मागणीचे निवेदन पाठवून निर्णय घेऊ व कळवू असे आश्वासन दिले.

आघाडीचे सरकार गांजा उत्पादन करणार्‍यांना संरक्षण देणारे असून आदिवासी शेतकर्‍यांना गांजा पिकविण्याची परवानगी द्या अशी मागणी राजेंद्र लहामगे व उपस्थितांनी केली. तर धान खरेदी केंद्र चालू न केल्यास महामंडळावर मोर्चा नेण्याचा इशारा देण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com